सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक दर्जाच्या टीव्ही व रेडिओ स्टुडिओचा सोलापूरच्या मार्केटिंगसाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
आज मंगळवारी, आमदार सुभाष देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन टीव्ही व रेडिओ स्टुडिओ आणि पुरातत्वीय संग्रहालयाची पाहणी केली.
यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे, प्रा. नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याशी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापुरातील विविध गोष्टींचे मार्केटिंग कसे करता येईल, यासंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर रेडिओ आणि टीव्ही स्टुडिओच्या माध्यमातून सोलापुरातील बारीक-सारीक गोष्टीच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुरातत्व संग्रहालयात ठेवण्यात आलेले विविध शिल्प, पुरातन वस्तू आदी पाहून आमदार देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचीही भेट
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध विभागात सुरू असलेले जागतिक दर्जाचे संशोधन पाहून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते परितेवाडीचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आनंद व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सात कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केलेले सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शनिवारी (ता. 18) सदिच्छा भेट देऊन विविध विभागातील संशोधन कार्याची माहिती जाणून घेतली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी त्यांचे स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. विकास पाटील यांनी भौतिकशास्त्र संकुलात सुरू असलेले जागतिक दर्जाच्या संशोधनाची माहिती दिली. विद्यार्थी व संशोधकांनी विकसित केलेले विविध उपकरणे, प्रोजेक्ट याचीही माहिती त्यांनी यावेळी डिसले यांना दिली.
यावेळी डॉ. एस. एस. सूर्यवंशी हे उपस्थित होते. भौतिकशास्त्र विभागाने अमोनिया सेन्सर, नायट्रोजन डाय ऑक्साईड सेन्सर, कोविड संरक्षित विशेष मास्कला भारत सरकारकडून मिळालेल्या पेटंटचे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी कौतुक केले.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले संशोधन विद्यापीठ करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केला. टीव्ही व रेडिओ स्टुडिओ तसेच विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या पायाभूत सोयी सुविधांमुळे त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.