सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या जिल्हा खो खो स्पर्धा
सोलापूर : सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या
मॅटवरील जिल्हा खो खो स्पर्धेत
वेळापुरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने विजेतेपद पटकाविले. येथील उत्कर्ष क्रीडा मंडळास उपविजेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय स्थान किरण स्पोर्ट्सने संपादिले.
ह.दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात वेळापूरने येथील उत्कर्ष क्रीडा मंडळास २०-१२ असे नमविले. हबीब शेखचे (४ गुण) धारदार आक्रमण आणि रामजी कश्यप (३.१० मिनिटे ४गुण) आणि गणेश बोरकरच्या (१.५०, १.४० मिनिटे व ३ गुण) अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्यांनी मध्यंतरासच ११-७ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. उत्कर्षच्या निखिल कापूरे (१.२०, १.५० मिनिटे), कुणाल तुळसे (१.४०,१.३०) व मोईन शेख (१.२० व २ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात किरण स्पोर्ट्सने मंगळवेढेच्या शिवप्रतिष्ठान क्लबवर ७-६ अशी १० सेकंद राखून मात केली.
सोलापूर जिल्हा अम्युचर खो खो असोसिएशन व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या सहकार्याने पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी ही स्पर्धा प्रथमच मॅटवरील आयोजीली होती. या स्पर्धेचे पारितोषिके पोलिस आयुक्त हरीश बैजल, पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली घाडगे, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे,राज्य शासकीय प्रशिक्षक सत्येन जाधव, खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण आदीच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.
□ सर्वोत्कृष्ट खेळाडू : गणेश बोरकर (अष्टपैलू), रामजी कश्यप ( आक्रमक), कुणाल तुळसे (संरक्षक).
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
● शिवप्रतिष्ठान मंगळवेढाची विजयी सलामी
सोलापूर : जिल्हा खो खो स्पर्धेत शुभम दत्तू (२.२०,१.३९ मिनिटे) व राज दत्तू (१.४० व २.१० मिनिटे ) यांच्या खेळीमुळे मंगळवेढेच्या शिवप्रतिष्ठान क्लबने किरण स्पोर्ट्स ब संघावर १३ – ११ अशी डावाने मात करील विजयी सलामी दिली. किरण स्पोर्ट्सच्या चेतन चव्हाण (४ गुण) यांनी कडवी लढत दिली.
सोलापूर जिल्हा अम्युचर खो खो असोसिएशन व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या सहकार्याने पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी ह.दे. प्रशालेच्या मैदानावर आयोजिलेल्या या स्पर्धेत ९ संघानी भाग घेतला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. यावेळी ह.दे. प्रशालेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
* प्रथमच मॅटवर जिल्हा खो खो स्पर्धा
प्रास्ताविकात पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली डॉ. घाडगे म्हणाल्या, पोलिस आणि नागरिक यांच्यात दुवा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खो खो स्पर्धा प्रथमच मॅटवर आयोजित केल्या आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालयाने यासाठी सहकार्य केले.
* राज्य बास्केटबॉल स्पर्धा घेणार
पोलिस आयुक्त बैजल म्हणाले, आजारावर मात करण्यासाठी शरीरिक क्षमता पाहिजे. निर्णय क्षमता तयार करण्याचे काम खो खो करतो. ती या खेळात आहे. पुढील वेळेस राज्य बास्केटबॉल स्पर्धा घेणार आहे.
* खेळाडूंनी लसीकरणासाठी जागृती करावी
पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, सोलापूरात ८० टक्के लसीकरण झाले आहे. परत नवीन व्हायरस येऊ शकतो. त्यासाठी खेळाडूंनी आपापल्या भागात नागरिकांमध्ये लसीकरणासाठी जागृती करावी.