नांदेड : संपकरी कर्मचाऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नांदेडमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. भिमराव सदावर्ते (वय 57 ) असं या आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदावर्ते यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. भीमराव सदावर्ते हे किनवट आगारात वाहक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होते.
नांदेडमध्ये वसरणी भागातील एसटी वाहकाने आज गळफास लावून आत्महत्या केली आहे. भीमराव सदावर्ते असं आत्महत्या करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. विलीनीकरणावर तोडगा निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सदावर्ते तणावात होते.त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
यात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत तर सरकार तोडगा काढायला तयार नाही अशातच आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेईना. दरम्यान यावर तोडगा निघणार आहे की नाही. तसेच सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एसटी कामगारांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजून संप केला जात आहे. यावरून संपकरी एसटी कामगारांवर राज्य सरकारकडून बडतर्फीची कारवाई केली जात आहे.
आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा संपकरी एसटी कामगारांना इशारा दिला. ‘एसटी कामगारांनी संप करत विलीनीकरणाचा मुद्दा आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परत हजर राहावे. अजूनही कामावर हजर झाला नाही तर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा परब यांनी दिला आहे.
ते मुंबईत बोलताना म्हणाले की, एसटी कामगारांवर संपामुळे आता मोठ्या प्रमाणात बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई सुरू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यात संपामुळे दोन महिने पगार नाही मिळाला तर त्याचेही नुकसान होईल. ही गोष्ट संपकरी कामगारांनी समजून घ्यावी.
आम्ही आतापर्यंत एसटी कामगारांच्या हिताचा विचार करत त्यांना 41 टक्के पगार वाढ दिली आहे. तरी सुद्धा कामगारांकडून केवळ विलीनीकरण या एका शब्दावर आडून बसत संप केला जात आहे. आता प्रत्यक्षरितीने बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे.
आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागेल. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे संप न करता कामगारांनी तत्काळ कामावर हजर होऊन काम सुरु करावे, असेही परब यावेळी म्हणाले.