पंढरपूर : सध्या केंद्र शासन तरुणींच्या विवाहाचे वय १८ वर्षावरुन २१ वर्षे करण्याचा कायदा करण्याच्या तयारीत आहे. असे असतानाच काल रविवारी (ता. २६) पंढरपूर तालुक्यातील दोन बालविवाह पोलीसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश आले आहे.
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी व आजोती येथे होणारे बालविवाह रोखले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कण्हेरगाव (ता.माढा जि सोलापूर ) येथील एका १३ वर्षीय मुलीचा बालविवाह पंढरपूर तालुक्यातील आजोती येथील युवकाशी होणार असल्याची गोपीनिय माहिती पोलीसांना मिळाली.
उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली पो नि मिलिंद पाटील, पोलीस अंमलदार परशुराम शिंदे, श्रीराम ताटे, बालाजी कदम, भराटे, तन्वी यादव यांनी सदर ठिकाणी अचानक जाऊन अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह होण्यापूर्वी रोखला. त्या मुलीस महिला व बालकल्याण समिती सोलापूर यांचे समक्ष हजर केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचबरोबर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये अकलूज येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह सोलापूर येथील युवकाशी मस्के वस्ती, तिसंगी (ता.पंढरपूर जि. सोलापूर) येथे होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली पो नि धनंजय जाधव,पोलीस उपनिरीक्षक केदार, पोलीस अंमलदार करचे, बाबर, सावंत, इंगोले, महिला पोलीस वाघे व राणी कडसरे यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन होणार बालविवाह विवाह होण्यापूर्वी थांबवून सदर मुलीला महिला व बालकल्याण समिती सोलापूर यांचे समक्ष हजर केले.
बालविवाह करणे हा बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार गुन्हा आहे. आपल्या आजूबाजूस अशा अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्यास तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात यावी. माहिती कळविणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीसांच्या विशेष पथकाने २ अल्पवयीन मुलींचे बालविवाह होण्यापूर्वी रोखले असून सदर मुलींच्या पालकांना कायद्याची माहिती देऊन योग्य प्रकारे समुपदेशन केले आहे व मुलींना बालकल्याण समिती समोर हजर केले असल्याची माहिती विक्रम कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर) यांनी दिली.