पुणे – पिंपरी चिंचवडमधील खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकावर आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली असून या गोळीबारात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशही किरकोळ जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्तात म्हंटलयं.
सहाय्यक पोलीस आयुक्त अमृतकर यांनी या संदर्भात माहिती दिली. कांही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा योगेश जगताप याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीसांनी सात आरोपींना अटक केली होती. प्रमुख गुन्हेगार व सुत्रधार गणेश मोटे, अश्विन चव्हाण व महेश माने यांना अटक करण्यासाठी सापळा रचला होता.
कोये येथील एका टेकडीवर आरोपी लपले होते. पोलीसांची चाहूल लागताच आरोपींनी थेट पोलीसावर गोळीबार केला. पोलीसांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले. अर्धा तास ही चकमक सुरु होती. शेवटी आरोपीच्या पिस्तुलातील गोळ्या संपल्या. त्यानंतर पोलीसांनी या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या पथकात स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहा. पो. आयुक्त अमृतकर , पी. एस. आय. सुनिल टोणपे व अन्य सहकाऱ्याचा समावेश होता.
विशेष म्हणजे घटनास्थळी दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील उपस्थित होते. अशी माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. ही चकमक काल रात्री चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत साडेअकराच्या सुमारास घडली आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वात अँटी गुंडा स्कॉड आणि सांगवी पोलीस गोळीबारातील आरोपींच्या मुसक्या आळवण्यासाठी सापळा रचला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या जाळ्यातून सुटण्यासाठी तिन्ही आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, मग प्रत्युत्तरात पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला. या चकमकीत पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्हेगारांनी 18 डिसेंबरला पिंपळेगुरव मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार केला होता, यात योगेश जगतापची हत्या झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार चाकण परिसरात एका एटीएम मशिनमधुन पैसे लुटल्याप्रकरणी आयुक्त कृष्णप्रकाश घटनास्थळी माहिती घेत होते. याचदरम्यान त्यांना योगेश जगतापच्या हत्येतील तिन्ही आरोपी चाकण जवळील कोये गावात लपून बसल्याचं समजलं. यानंतर कृष्णप्रकाश यांनी पोलिसांची चार पथकं तयार करुन कोये गावात तिन्ही आरोपींची शोधमोहीम राबवली.
यादरम्यान हे आरोपी शेतातील एका घरात लपून बसल्याचं पोलिसांना समजलं. पोलीस या ठिकाणी कारवाईसाठी दाखल होताच आरोपींना कुणकुण लागली. पोलिसांचं एक पथक कारवाईसाठी घराजवळ आलं असता, आरोपींनी आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलातून दोन गोळ्या पोलीस पथकाच्या दिशेने चालवल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने तीन गोळ्या चालवल्या.
परंतु या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून जात असल्याचं लक्षात येताच आयुक्त कृष्णप्रकाश यांनी जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या झाडाचा एक मोठा भाग आरोपींच्या दिशेने फेकला. यामुळे आरोपी गोंधळून गेले आणि पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं.
या कारवाईत कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला जखमा झालेल्या नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. रात्रीच्या वेळी जंगल परिसरात झालेल्या या कारवाईत काही पोलिसांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 18 डिसेंबरला या तिन्ही आरोपींनी योगेश जगतापची हत्या केली होती, यानंतर आरोपींनी आपला पिस्तुलासोबतचा एक व्हिडीओ स्टेटसवर ठेवला होता.