अहमदनगर : महाराष्ट्रात आज काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात गारपीट झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काही गावात अवकाळी पाऊस पडला आणि गारपीट झाली. या भागातील शेतकऱ्यांचं या गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय.
पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात काही भागात गारपीट झाली. अकोला शहरात गारपिटीसह जोरदार पाऊस बरसला. हवामान विभागाने आधीच 28 आणि 29 डिसेंबरला पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अहमदनगर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर , नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली.
गोदावरी नदी किनाऱ्याच्या गावात गारपिटीनं तडाखा दिलाय. श्रीरामपूर, नेवासासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काही गावातही अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गारपिटीनं पिकांचं नुकसान नगरच्या श्रीरामपूर, नेवासा आणि वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये गारपीट झाली.
या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू आणि हरबऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अचानक झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. राज्यातील सुरु असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलंय. मोठ्या मेहनतीनं पिकवलेल्या शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याचं संकट शेतकऱ्यांवर ओढावलं आहे.
दरम्यान, राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही काही भागात गारपीट झाल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरात गारपिटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. अकोला शहरांच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसासोबत गारपीटही झाली आहे. सकाळपासूनच अकोला शहरात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारनंतर अकोला शहरात जोरदार पाऊस झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज ( 28 डिसेंबर) आणि उद्या (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरलाय. मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असून महाराष्ट्रात आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन ऑरेंज ॲलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला होता. दरम्यान, 29 डिसेंबरला पूर्व विदर्भात ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. तर चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आलाय. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
हवामान खात्याने उद्या अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर गोंदिया, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली येथे येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे 27 आणि 28 डिसेंबर रोजी उत्तर-पश्चिम हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
तर 28 आणि 29 डिसेंबर पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. त्याच बरोबर येत्या 2 दिवसांनंतर मध्य व पूर्व भारतात 2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता आहे.