रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पेट्रोलसंदर्भातील घोषणेचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे. सोरेन यांनी गरिब आणि मध्यमवर्गीय दुचाकीस्वारांसाठी पेट्रोल लिटरमागे २५ रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली.
२६ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यानंतर सोरेन चर्चेत आहेत. तसेच सोरेन यांच्याप्रमाणे इतर राज्यांनीही असाच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचा दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला असल्याने वारंवार ते कमी करण्यासाठी मागणी होत आहे. यादरम्यान झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल २५ रुपये स्वस्त मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही घोषणा केली आहे.
या स्वस्त पेट्रोल आणि डिझेलचा लाभ फक्त बीपीएल कार्डधारकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील बीपीएल कार्डधारकांना पेट्रोल आणि डिझेल २५ रुपये स्वस्त मिळेल असं सांगितलं आहे.
पेट्रोल-डीजल के मूल्य में लगातार इजाफा हो रहा है, इससे गरीब और मध्यम वर्ग के लोग सबसे अधिक प्रभावित हैं। इसलिए सरकार ने राज्य स्तर से दुपहिया वाहन के लिए पेट्रोल पर प्रति लीटर ₹25 की राहत देगी, इसका लाभ 26 जनवरी 2022 से मिलना शुरू होगा:- श्री @HemantSorenJMM pic.twitter.com/MsinoGS60Y
— Office of Chief Minister, Jharkhand (@JharkhandCMO) December 29, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
झारखंडमधील पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन वारंवार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी करत होतं. असोशिएशन सरकारला पेट्रोलवरील पाच टक्के व्हॅट कमी करण्याची मागणी करत होतं. सरकारने जर व्हॅट कमी करुन २२ टक्क्यांवरुन १७ टक्के केला तर लोकांना मोठा दिलासा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. झारखंडची शेजारी राज्यं उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये डिझेलच्या किंमती कमी असल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे. त्यामुळे झारखंडमध्ये चालणारी वाहनं शेजारी राज्यांमध्ये जाऊन डिझेल भरत आहेत. याचा मोठा तोटा त्यांना सहन करावा लागत होता.
असोशिएनचे अध्यक्ष अशोक सिंह यांनी सांगितलं आहे की, “पेट्रोलियम डिलर्सनी हेमंत सोरेन यांना चिठ्ठी लिहिली होती आणि अर्थमंत्र्यांची भेटही घेतली होती. पण कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही. आपण अर्थमंत्र्यांकडे निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावर कोणताही विचार करण्यात आला नाही”. त्यांनी सांगितलं होतं की, झारखंडमध्ये १३५० पेट्रोल पंप आहेत, ज्यांच्यावर अडीच लाख कुटुंब अवलंबून आहेत. व्हॅट जास्त असल्याने व्यवसायांनाही मोठा फटका बसत आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी नवीन वर्षात पेट्रोल प्रतिलिटर स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या नागरिकांना मोटारसायकल आणि स्कूटरसाठी हे स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.