मुंबई : केरळच्या कोझिकोड येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत दुबईवरून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 21 जणांनी प्राण गमावला आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र पायलट दीपक वसंत साठे (वय 58) यांचाही मृत्यू झाला. मूळचे नागपूर येथील असणारे कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट होते. त्यांचा सख्खा भाऊ देखील लष्करात होता.
अपघातग्रस्त विमानाचं त्यांनी दोन वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवलं पण त्याला अपघात झाला. धावपट्टीवर पाणी साचलं होतं, तसंच सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिवंगत महाराष्ट्राचे सुपुत्र पायलट दीपक वसंत साठे यांच्या घरी जावून आई वडिलांची भेट घेवून सांत्वन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपले दोन्ही पुत्र देशासाठी गमावलेल्या निला साठे यांनी नागपूर येथे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ‘दीपक हा कर्तृत्ववान मुलगा होता. कोणालाही मदत करण्यात तो सर्वात आधी पुढाकार घेत होता. त्याने आपले जीवन देशासाठी अर्पण केले’ असे उद्गार कॅप्टन दीपक वसंत साठे यांच्या मातोश्री निला साठे यांनी भरल्या डोळ्यांनी काढले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या मुलाच्या आठवणी ताज्या केल्या.
एअर फोर्समध्ये असताना दीपक वसंत साठे यांनी स्वॉर्ड ऑफ ऑनरचे विजेतेपद मिळवले होते. तसेच आठ शौर्य पदक देखील जिंकले होते, असेही निला साठे यांनी सांगितले. अपघात होण्याच्या काही दिवसा आधीच मुलाशी फोनवर संवाद झाला होता, त्यावेळी त्याने ‘आई कोरोना असल्याने जास्त बाहेर जाऊ नको’, असे बजावले होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच दीपक यांचे वडील लष्करात कर्नल पदावर कार्यरत होते आणि 30 वर्ष देशसेवा केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुले सैन्यात भरती झाले होते. फिरोझपूर येथे 1981 ला झालेल्या अपघातात मोठा मुलगा विकास हुतात्मा झाला, असेही निला साठे यांनी सांगितले.
* पायलट दीपक साठेंविषयी माहिती
हवाई दलात दीपक साठे 1981 मध्ये वैमानिक म्हणून रूजू झाले होते. भारतीय वायू दलातील एक निपुण पायलट म्हणून दीपक साठे यांची ओळख होती. ते एक निष्णात टेस्ट पायलट म्हणून ओळखले जात होते. नागपुरातील भरत नगरात दीपक साठे यांचे आई-वडील राहतात. कॅप्टन दीपक साठे यांच्या आईचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी मुलाच्या अपघाती मृत्युची माहिती कळली.
पायलट दीपक साठे पुण्यातील एनडीएमधून प्रशिक्षण घेतलं होतं. 2003 पर्यंत त्यांनी लढाई वैमानिक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर निवृत्ती घेऊन ते एअर इंडियात कार्यरत होते. सुरुवातीला त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे एअरबस 310 हे विमान चालवले. त्यानंतर ते बोईंग विमानावर रुजू झाले होते. साठे हे हवाई दल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर होते. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 58 च्या तुकडीचे विद्यार्थी होते. एनडीएच्या तुकडीचे दीपक साठे हे टॉपर होते. स्वॉर्ड ऑफ ऑनरचे साठे हे विजेते होते.
“माझ्या मुलाने स्वतःचे प्राण देऊन इतर लोकांचे प्राण वाचवले. तो आणि त्याचा भाऊ दोघेही लष्कर आणि वायूसेनेत कार्यरत होते. दीपक यांना सर्वच ठिकाणी पहिले पदक मिळाले. वायूसेनेची आठही पदकं त्यांना मिळाली. घोडेस्वारीसकट सर्व खेळांमध्ये ते निपुण होते. दीपक हा कर्तृत्ववान मुलगा होता. कोणालाही मदत करण्यात तो सर्वात आधी पुढाकार घेत होता. त्याने आपले जीवन देशासाठी अर्पण केले”
– निला साठे, मातोश्री