सोलापूर – शेतातील वस्तीवर घराला कुलूप लावताना झाडावरचा साप डोक्यावर पडून नाकाला दंश केल्याने शेतकरी जखमी झाले. ही घटना दोड्याळ (ता.अक्कलकोट) येथे आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
चनबसप्पा मल्लेशप्पा जोकारे (वय ५३) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सकाळी शेतात काम करून दुपारच्या सुमारास घराला कुलूप लावत होते. त्यावेळी झाडावरचा साप अचानक डोक्यावर पडून त्यांच्या नाकाला दंश केला. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ बापुजी नगरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – शास्त्रीनगर परिसरातील बापूजी नगरात राहणाऱ्या बापू रामचंद्र म्हेत्रे (वय ४९) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडून सय्यद म्हेत्रे (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही .
□ कामती येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे राहणाऱ्या दीपक आगतराव माळी (वय ३४) याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला बेशुद्धावस्थेत गोपीनाथ माने (मित्र) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.
Farmers injured by snake bite on tree; Loss of Rs 5 lakh due to burning of sugarcane in Mohol
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ ऊस जाळून केले पाच लाखाचे नुकसान, आज्ञात व्यक्ती वर गुन्हा दाखल
मोहोळ : शेतातील चार एकर ऊसासह त्यातील ठिंबक सिंचन अज्ञात व्यक्तीने जाळून एकूण चार लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना दि.१४ फेब्रुवारी रोजी पेनूर (ता. मोहोळ) येथे दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पेनूर (ता. मोहोळ) येथील कार्तिक कुबेर चवरे यांच्या शेतामध्ये पंधरा महिन्याचा ऊस आहे. दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील मुद्दाम लबाडीने ऊस पेटवून दिला. यावेळी शेजारच्या शेतकऱ्यांनी शेतमालकाशी संपर्क करीत त्यांना ऊस पेटला असल्याची माहिती दिली.
तात्काळ स्थानिक नागरिक व ट्रॅक्टर, रोटावेटर च्या मदतीने उसाची तूट करून आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र यातील चार एकर ऊस आणि त्यातील ठिबक सिंचन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद शेतकरी कार्तिक कुबेर चवरे यांनी दिली आहे. यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार लोबु चव्हाण करीत आहेत.