● अक्कलकोटच्या विकासासाठी दीड कोटी जाहीर
सोलापूर /अक्कलकोट : जलसंपदा विभागातील 14 हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक -दोन महिन्यात 14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असं ते म्हणाले. सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत ते बोलत होते.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पाचव्या पर्वातील दुसऱ्या दिवशीची सभा अक्कलकोट येथे घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. व्यासपीठावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक सुरेश घुले,जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, व्यापार व उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, माजी नगराध्यक्ष महानंदा स्वामी, अल्पसंख्याक अध्यक्ष वसिम बुरहाण, लतिफ तांबोळी, जिल्हा निरीक्षक दिपाली पांढरे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड, महिला कार्याध्यक्षा रंजना हजारे, विद्यार्थी विभागीय अध्यक्ष सुहास कदम, तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम आदी उपस्थित होते.
Recruitment of 14 thousand posts in Water Resources Department; Announcement by Jayant Patil
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान अक्कलकोटला आठ दिवसाने पाणी मिळते, अशी तक्रार महिलांनी मांडली. याबाबत आताच सीईओशी बोललो आहे. ठेकेदारामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र त्या ठेकेदाराचे काम रद्द करा आणि नवीन ठेकेदार नेमा, असे आदेश दिले आहेत.
तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी खास करून महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अक्कलकोटसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून देईल. अगदी थोड्याच दिवसात हे काम तातडीने पूर्ण केले जाईल, यात मी स्वतः लक्ष घालेन. याची हमी मी देतो, असा विश्वास उपस्थितांना दिला. अक्कलकोटमधील एकरुख व देगाव कॅनालचा प्रश्नही तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम वेळेवर होत नाही, ही बाब गंभीर असून तात्काळ या कामात लक्ष घातले
जाईल आणि या कामाचे भूमिपूजन आता मीच करेन, असे जाहीरपणे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सिद्धे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जनता दरबार, शाखा उद्घाटन यासारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत पक्ष बळकट होईल, असे अभिवचन दिले.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकार्यांकडून प्रश्न उत्तर स्वरूपात पक्षवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. पक्ष वाढीच्या कामात काही सुधारणा करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. दरम्यान पाटील यांच्या भाषणावेळी पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवल्याबद्दल उपस्थित महिलांनी त्यांचे आभार मानले.
□ अक्कलकोटच्या विकासासाठी दीड कोटी जाहीर
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार अक्कलकोट नगरपालिकेसाठी खास
बाब म्हणून १ कोटी रुपये विकास कामासाठी मंजूर करत आहे. त्याचा प्रस्ताव तातडीने उद्या संध्याकाळपर्यंत माझ्यापर्यंत पोहचवा. चपळगाव मतदारसंघात रस्ते खराब आहेत, अशी तक्रार येथे करण्यात आली. त्याबाबतीतही मी गंभीर असून या रस्ते दुरुस्तीसाठी डीपीडीसीतून ५० लाख रुपयांची तरतूद तातडीने करत आहे, अशी घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
■ जलसंपदा विभागाची आढावा बैठक
राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोलापुरात असताना जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीची माहिती घेतली व बैठकीत आलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
एकरुख उपसा सिंचन योजनेचा दर्गनहळ्ळी कालवा व त्यावरील वितरण व्यवस्थांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आष्टी उपसा सिंचन योजनेची शिर्ष कामे पूर्ण असून प्रगतीपथावरील डाव्या व उजव्या कालव्यावरील उर्वरित कामे पूर्ण करुन, वितरण व्यवस्थेची कामे तातडीने पूर्ण केली जातील.
शिरापूर उपसा सिंचन योजनेची शिर्ष कामे पूर्ण असून प्रगतीपथावरील डाव्या व उजव्या कालव्यावरील उर्वरित कामे पूर्ण करुन रानमसले, वडाळा, भोगाव, बीबी दारफळ, गुळवंची वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना क्षेत्रिय अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर व नगर जिल्ह्यातील वारंवार दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये उन्हाळ्यातील ३ ते ४ महिने नदीपात्रात पाणी रहावे यासाठी ओटेवाडी ता. कर्जत येथे प्रस्तावित बुडीत बंधाऱ्याचे अंदाजपत्रक राज्यतांत्रिक सल्लागार समिती यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
खेराव मानेगाव उपसा सिंचन योजना, माढा तालुक्यातील खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेंचे सर्वेक्षण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
भीमा-सिना जोड कालव्याच्या शाफ्ट क्र. ३ मधून बंद ओढा येथे पाणी उपलब्ध करुन देणे तसेच भीमा सिना जोड कालव्याच्या खालील बाजूस गेट बसविण्याबाबतचे प्राथमिक प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील महसूल, जलसंपदा, भुमी अभिलेख कार्यालयांनी जिल्ह्यातील भूसंपादनाचे विषय प्रथम प्राधान्याने कालबद्धरित्या मार्गी लावावेत अशा सुचना दिल्या. मोहोळ तालुक्यातील काही गावांना पाणी देण्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सीना माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या गावामध्ये PDN मुळे बचत झालेले पाणी बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगांव, कुडू, अंबाड व पिंपळखुंटे या गावांना देण्याबाबत सदर प्रस्तावित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बोरी धरणावर MESCO चे सुरक्षा रक्षक नेमावे असे सुचित केले.