मुंबई : मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या कुर्ला येथील नूर मंजील या निवासस्थानी भल्या पहाटे ईडीचे अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मलिक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. मात्र नवाब मलिकांना अधिकाऱ्यांनी अचानक येत बळजबरीने नेले, असा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यलयासमोर आंदोलनासाठी एकत्र आले होते.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची एका जमीन व्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे. अटकेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होते. या चौकशीतून काय समोर येईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
आज पहाटे ४.३० वाजता ईडीचे अधिकारी हे नवाब मलिक यांच्या घरी आले. नवाब मलिकांना त्यांच्या कारने ईडीच्या कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. ॲडवोकेट आमीर मलिक हेदेखील नवाब मलिकांसोबत ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती नवाब मलिक यांच्या कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर नवाब मलिक प्रकरणातही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अंडरवर्ल्ड कनेक्शन मुस्लिम कार्यकर्त्यांशी साहजिकच जोडला जातो असेही त्यांनी भाष्य केले. एकुणच केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही आम्हाला माहित होती, असे शरद पवार म्हणाले. ED starts interrogation of Nawab Malik; Sharad Pawar’s reaction
सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?पण लक्षात ठेवा…
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/kaw7AfG8Xj— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई हे काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे, त्यानुसार आज ना उद्या हे घडेल याची कल्पना होती. पण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना अशा पद्धतीने त्रास दिला जाईल, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करायचे काही गरज नाही. कशाची केस काढली आहे हे आम्हाला माहित नाही. पण जे काही घडले आहे, त्यामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय हे स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले.
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, ” नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत, जे सातत्याने बोलत आहेत. असत्य उघड करत आहे, मुखवटे उलगडून काढत आहेत. सत्य बोलत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी,सीबीआय वगैरे लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीची लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठीक आहे, चौकशी होईल आम्ही वाट बघतोय. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. आताच माझं सगळ्यांची वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं आहे.”
भाजपा सत्तेसाठी ईडीचा वापर करत असून कारण नसतानाही मंत्र्यांच्या घरावर धाडी मारल्या जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता भाजपाला पाहवली जात नसल्याने ते नवनवीन कुरापती करत आहेत, असं कोल्हे म्हणाले. शिवाय तपासयंत्रणा या भाजपाच्या झाल्या असून तुमच्या नेत्यांच्या कोणत्याच भानगडी नाहीत का?, असा सवाल केला आहे. तसेच तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले आहे.