सोलापूर : माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे,’ असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांच्याच कार्यकर्त्यांने सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दाखल केली आहे.
भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनीच आरोप केला आहे. स्वराज ॲग्रो इंडिया ॲग्रो लिमिटेड या कारखान्याचे व स्वराज नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी खोटी बीले देऊन आपली चार कोटी ४० लाखांची फसवणूक केली. त्यामुळे खासदार निंबाळकर व सर्व संचालकांविरुध्द विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी दिगंबर आगवणे यांनी केली आहे. त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत आरोप केले.
२००७ मध्ये रणजितसिंह यांच्याशी आपला संपर्क आला. डेअरीच्या बॉयलरसाठी त्यांना लाकडे पुरवीत असल्याने आमच्यात आर्थिक व्यवहार होते. रणजितसिंह यांना कारखाना उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे २०१४ ला त्यांची पिंपळवाडी येथील जमिन गहाण ठेवत कारखान्यास कर्ज मिळविण्यासाठी व कारखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिस्टलरी प्रोजेक्टसाठी वेळोवेळी मोठ्या रकमेचे कर्ज खासदार रणजितसिंह व संचालकांनी बँकांच्या संमतीने काढले. घनिष्ट संबंधापोटी सदर कर्जासाठी माझी जमिन गहाण ठेवली आहे. कारखाना सुरु झाल्यानंतर कोजन बाबत व त्याच्या उत्पन्नाबाबत तोंडी व्यवहार झाला. त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने आपण नांदल, गिरवी येथील जमिनी गहाण ठेवून कर्ज काढले, त्याची रक्कम आरटीजीएसद्वारे खासदार रणजितसिंह यांच्या खात्यावर जमा केली, असा दावा, आगवणे यांनी केला आहे.
नोव्हेंबर २०१७ मध्ये आयूर ट्रेडर्स कंपनीच्या खात्यातून स्वराज कारखान्याच्या खात्यावर बग्यास खरेदीसाठी पाठविलेल्या रकमेचे मला बिल मिळाले नाही. प्रत्यक्षात खासदारांनी टर्न ओव्हर दाखवण्यासाठी मला ७ ते ८ कोटी रुपयांची खोटी बीले देत माल विक्री केल्याचे दाखविले. सदर कंपनी २०१८ मध्ये आगीत भस्मसात होवून माझे ७ कोटींचे नुकसान झाले. त्यावेळी खासदार रणजितसिंह यांनी खोट्या बिलांचा माल कंपनीत दाखवून विम्याचा क्लेम करण्यासाठी धमकावले होते, असा आरोपही आगवणे यांनी केला आहे. MP Nimbalkar commits fraud of Rs 4 crore, says MP, current ‘Mr Natwarlal’
खासदार हे स्वराज पतसंस्थेचे चेअरमन असल्याने त्यांनी २०१३ मध्ये पत्नीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माझ्या नावे कर्ज काढले होते. २०१६-१७ मध्ये आपल्या वाद सुरु असलेल्या सुरवडी येथील जमिन खासदारांनी गहाण ठेवत मोठे कर्ज घेतले. या प्रकरणात आपल्या सह्या असल्या तरी मला रक्कम मिळाली नाही. त्यापैकी त्यांच्या कारखान्याने परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेत भरल्याचे मला समजले. खासदार रणजितसिंह यांना दिलेल्या कर्जापायी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव काढल्याची नोटीस बँकेकडून मला मिळाली आहे.
या प्रकारामुळे रणजितसिंह व स्वराज कारखाना व पतसंस्था यांचे सर्व संचालक यांनी संगनमताने विश्वासघात करुन फसवणूक केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा. रणजितसिंह हे भाजपचे खासदार असल्याने ते पदाचा गैरवापर करुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता व्यक्त करुन त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचेही आगवणे यांनी म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● आगवणे हा सध्याच्या काळातील मिस्टर नटवरलाल
दिगंबर आगवणे याच्यावर दाखल असलेले दावे त्याचे आम्ही भरलेले चेक आणि आता कारखाना त्याच्यावर करत असलेली कारवाई थांबवण्यासाठीच त्याचा हा व्यर्थ खटाटोप आहे. साडेतीन एकरावर कोणती बँक दोनशे कोटीच्या वर कर्ज देते असा सवाल भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. तसचे आगवणे हा सध्याच्या काळातील मिस्टर नटवरलाल आहे, अशी खरमरीत टिका करत निंबाळकर यांनी आगवणे यांचे आरोप फेटाळून लावले.
आमदारकीला दिगंबर आगवणेला जी मते मिळाली ती फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच मिळाली आहेत.
साखरवाडी येथील एकच जमीन आगवणे यांनी दोन ते तीन बँकांना तारण ठेवलेली आहे. त्यामुळे विविध बँका अडचणीत आलेल्या आहेत. दिगंबर आगवणे यांनी विविध बँकाना यापुर्वीच फसवले आहे. आगवणेस पूर्वी जी मदत केली ती चांगल्या भावनेनेच केली होती. आगवणेचे आरोप बिनबुडाचे आहेत. आगवणेंना जे पैसे दिलेले आहेत ते चेक व बँकेद्वारेच दिले आहेत. आगवणेवर विश्वास ठेवला पण तो माणुसच बोगस निघालाचा, आरोप निंबाळकर यांनी केला.
आगवणे यांना यापूर्वी स्वराज पतसंस्थेमधून कर्ज दिलेले होते. त्यांस पुन्हा पैश्याची गरज भासल्याने त्यांनी नव्याने कर्ज काढले. त्यावेळी जुने कर्ज भरले. आगवणे यांच्या कर्जाचा कधीही हप्ता आम्ही भरलेला नव्हता व नाही, असेही निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आगवणे ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले होते, त्यावेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. व त्या कर्जासाठी त्यांनी तारण सुध्दा ठेवलेले होते. तर ते कर्ज बोगस कर्ज कसे होईल, असा सवाल निंबाळकर यांनी उपस्थित केला.