तिरुवअनंतपूरम : केरळमध्ये शुक्रवारी इडुक्की जिल्ह्यात राजमाला येथे भूस्खलन होऊन चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांची वसाहतच वाहून गेली. यात 43 मजुरांचा मृत्यू झाला असून 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मलब्याखाली आणखी काही जण दबल्याचा संशय आहे. दुर्घटनेत मरण पावलेले सर्व मजूर तामिळनाडूचे आहेत.
इडुक्की दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओ कार्यालयाने यातील मृतांचा नातेवाईकांना प्रत्येक 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. ज्या भागात भूस्खलन झाले त्या राजमला येथील रहिवासी पार्थसारथी यांनी प्रासारमाध्यमांना सांगितले की, त्या ठिकाणी 78 मजूर आणि त्यांचे कुटुंबीय होते मात्र, ज्यावेळी भूस्खलन झाले तेव्हा तेथे कितीजण होते याची माहिती नाहीये. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे अनेक मजूर आपल्या घरी होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज रविवारी भूस्खलन झालेल्या ठिकाणावरून मलब्याखाली दबलेले आणखी 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यात एका सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. यामुळे आता मृतांची संख्या 43 झाली आहे. मलब्याखाली आणखी काही जण दबले असून त्यांना बाहेर काढण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे.
इडुक्की जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. राजमाला येथे डोंगरपायथ्याशी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांची वसाहत आहे. या ठिकाणी एकुण 78 मजूर राहत होते. हे सर्व मजूर तामिळनाडूमधील आहेत.