अक्कलकोट/ सोलापूर : अक्कलकोट- गाणगापूर रोडवर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळुन झालेल्या अपघातात कारमधील चार महिला व चालक असे एकूण पाच जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दोन जण गंभीर जखमी झाले. भरधाव कारचा टायर फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला आहे.
अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकमधील अफझलपूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास कर्नाटकातील अफझलपूर पोलिस करत आहेत. शुक्रवारी (ता. ११) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, पाचही जण जागेवरच ठार झाले. याची अफझलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४),पत्नी छाया बाबासाहेब वीर (वय ५०), मुली कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिली बाबासाहेब वीर (वय १३), चैत्राली दिनकरा सुरवशी (वय २४) गंभीर जखमी झाले.ममनी (वय ३) यांचा समावेश आहे. ममनी ही बालंबाल बचावली. सर्व प्रवाशी अहमदनगरचे आहेत.
अहमदनगर येथील वीर कुटुंबीय अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन करून पुढे श्री दत्तात्रेयाचे स्थान असलेल्या गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथील देवदर्शन आटोपून हे भाविक अक्कलकोटच्या दिशेने परत निघाले होते.
अफझलपूर तालुक्यातील बळोरगी गावाजवळील गुत्तेदार यांच्या शेताजवळ येताच कारचा पुढचा टायर फुटला. तेव्हा कार फरफटत रोडच्या कडेला असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. वेगात असलेल्या कारची समोरची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. त्यामधील पाचजण जागेवर ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कारमधील सर्वजण वारल्याने व दोन जण वाचलेले गंभीर जखमी असल्याने अहमदनगरवरून नातेवाईक निघाले आहेत ते आल्यावरच रात्री उशिरा फिर्याद दाखल होईल, अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली.
□ होटगी रोडवर रेल्वेखाली इसमाची आत्महत्या
सोलापूर – होटगीरोडवरील आयकर भवनाजवळ धावत्या रेल्वे खाली राजू पदम जाधव (वय ४६ रा. साईनाथनगर, नई जिंदगी) या विवाहित इसमाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मणुरे पुढील तपास करीत आहेत.
□ अपघातामधील जखमीचा मृत्यू
सोलापूर : वाळूज येथे दुचाकी घसरून जखमी झालेला बालाजी तानाजी सोनवणे (वय३६ रा.हिंगणी ता.बार्शी) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी (ता. ११) सकाळी मरण पावला. तो मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अकलूज ते आपल्या गावाकडे असा दुचाकीवरून प्रवास करीत होता. वाळुज जवळ दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.