जयपूर : राजस्थानातील सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे.
आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीनंतर सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. महिनाभरापूर्वी राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेहलोत-पायलट संघर्ष उफाळून आला होता. त्यामुळे सरकारसमोर अस्थिरतेचं संकटही उभं राहिलं होतं. महिनाभरापासून हा सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील आधी मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर राजस्थानमध्ये पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले. यामुळे काँग्रेसमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद उफाळून आला आहे. पक्षात तरुण नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा होत आहे.
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्यानंतर पीटीआयनं वृत्त दिलं असून, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भेटीबरोबरच सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचीही संपर्कात आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुरूवातीला केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. या आरोपानंतर गुजरात पोलिसांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस दिली होती.
पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर गेहलोत-पायलट वाद चिघळला. पायलट यांनी थेट बंडखोरी करत १८ आमदारांसह जयपूर सोडलं. तेव्हापासून सचिन पायलट यांनी या विषयावर विस्तृतपणे भूमिका मांडलेली नाही. ते भाजपात जाणार असल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, आपण भाजपात जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
* सचिन पायलट यांनी घेतली मवाळ भूमिका
सचिन पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. या भेटीत राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी या होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केलीय. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.