सोलापूर : शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही मित्र पक्षांचे सरकार असले तरी राज्यभर ठिकठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा संघर्ष होत आहे. शिवसेनेच्या तक्रारीवर शरद पवार यांचे निकटवर्तीय, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीने चौकशी केली. शेतकऱ्यांच्या बनावट नावावर कर्ज उचलणे व ते पैसे स्वत:कडे वळवून घेणे याची ईडी चौकशी करत आहे. 500 कोटी रूपयांचा हा घोटाळा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बबनराव शिंदे यांच्याकडे आता ईडीने आपला मोर्चा वळवला आहे. माढा येथील सूत गिरणीतील गैरव्यवहार आणि साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या नावे उचललेल्या कर्जप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ईडीची ही पहिलीच कारवाई आहे. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीतील मोठे नाव असलेल्या आमदार बबनराव शिंदे व त्यांचे सुपुत्र आणि जिल्हा दूध संघाचे नूतन अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांच्या सहकारी तसेच खासगी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या.
500 crore scam, ED inquiry of NCP leader in Solapur on Shiv Sena complaint
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आमदार बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सूतगिरणीच्या व्यवहारात गैरव्यवहार केला असल्याची तक्रार उपळाईचे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी केली होती.
आमदार शिंदे यांच्या कारखान्यासंदर्भात अशाच प्रकारची दुसरी एक तक्रार टेंभुर्णीतील पूर्वाश्रमीचे भाजपा आणि आता शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी केली होती. त्यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या नावे परस्पर उचललेल्या कर्जाचे प्रकरण आहे. या दोन्ही तक्रारींची दखल घेत ईडीने आता एकत्र चौकशी सुरू केली असून जबाबाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे ईडीचे पहिले पाऊल काय ? याची जोरदार चर्चा माढ्यात सुरू झाली आहे.
याबाबत आमदार शिंदे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र बबनराव शिंदे यांना ईडीने बजावलेल्या दोन समन्सचे फोटो माध्यमांच्या हाती सापडले आहेत. त्यामुळे मागील ३ महिन्यांपासून ही चौकशी सुरु असण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज
उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
□ राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना
माढा तालुक्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी देखील आमदार शिंदे यांच्या विरोधात साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तक्रारी दाखल केल्या. कोकाटे केवळ तक्रार दाखल करुन थांबले नाहीत, तर या तक्रारीचा पाठपुरावाही त्यांनी केला. त्यानंतरच आमदार शिंदे यांना ईडीकडून नोटीस मिळून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र यांची ईडी कडून जबाब नोंदवण्याचे काम करण्यात आले आहे.