पुणे : गुढीपाडव्या दिवशी मनसेच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली विधाने चर्चेत आली. त्या सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन हिंदूंना व कार्यकर्त्यांना राज यांनी केले होते. पण पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी राज यांचा हा आदेश धुडकावला आहे. “मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे मी हनुमान चालिसा लावणार नाही”, असे मोरेंनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यामधील मुस्लीम पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्यानंतर कल्याणमधील मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी थेट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करताना समाजातील लोक आम्हाला जाब विचारत असल्याचे म्हटले आहे. या मुद्यावरून मनसेत अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नसल्याचे म्हणत राज ठाकरेंचा आदेश धुडकावून लावला. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचे म्हणत भूमिकाही स्पष्ट केली.
आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु सध्या रमजान सुरू असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आलेला आहे. मशिदींवरील भोंगे काढले नाही तर हनुमान चालीसा लावणार असे राज ठाकरे म्हणाले आहेत. याचा अर्थ राज्य सरकारने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, असे मोरे म्हणाले.
I will not make Hanuman Chalisa; MNS leader rejects Raj Thackeray’s order
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ राज ठाकरेंच्या भाषणानंतर मुस्लिम कार्यकर्ते सोडताहेत मनसे
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर मनसेचे मुस्लिम कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत. मशिदीवर भोंगे लावले तर समोर हनुमान चालिसा लावा, असे आवाहन राज यांनी केले. त्यानंतर मनसैनिकांनी त्याची अंमलबजावणीही सुरु केली. यानंतर पुण्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
‘साहेब माणसं जोडायला शिका, माणूस जर एकदा तुटला तर तो परत येत नाही. त्यामुळं माणसं जोडा’, अशी आर्त हाक एका जुन्या मनसैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे. राज ठाकरे यांचा ‘मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा’ या विधानावरून नाराज होत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देखील दिली आहे.
मुंबईत काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावली देखील. पण पुण्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मुस्लिम मनसैनिकांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. अगदी पक्षाच्या सुरुवातीपासून सोबत राहिलेल्या या पदाधिकाऱ्यांना आपला पक्ष सोडताना दुःख मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
मनसेच्या स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रत्येक आंदोलनात सक्रिय असलेले पुणे शहराचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहबाज पंजाबी यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भावना दुखावल्या म्हणून राजीनामा दिलेला आहे. ज्या राज ठाकरेंनी सोळा वर्ष मला वाढवलं. त्याच राज ठाकरेमुळे आज मी शून्य झालो, असल्याची भावना पंजाबी यांनी व्यक्त केली आहे. यापुढे पुन्हा मनसेत जाणार नाही, अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. पुणे शाखाप्रमुख माजीद अमीन शेख यांच्यासह अनेकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मनसेचे आणखी काही मुस्लिम कार्यकर्तेही राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.