● संजय राऊतांवरील ईडीसह राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत झाली चर्चा
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असाही विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचेही सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. तसेच या बैठकीत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे, असे आपण मोदींना म्हटल्याचे पवारांनी सांगितले. तसेच राज्यपालांनी अजून 12 आमदारांची नियुक्ती केली नाही, यासंदर्भातही यावेळी चर्चा केल्याचे पवार म्हणाले.
Sharad Pawar Modi’s visit: Mahavikas Aghadi government will come again – Pawar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल २०-२५ मिनिटे चर्चा झाली. नेमकी कशासंदर्भात चर्चा झाली याची माहिती स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा विषय आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई संदर्भात पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
शरद पवार माहिती देताना म्हणाले की, “संजय राऊत राज्यसभेचे सहकारी, सामनाचे संपादक त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. त्यांचं फ्लॅट आणि अर्धा एकर जमीन जप्त केली आहे. हा अन्याय आहे. राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार असल्याने मी ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या कानावर टाकली,” असं शरद पवार यांनी सांगितलं. गेल्या अडीच वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन विषय मोदींच्या कानावर घातले. या २ विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे.
शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?, असा सवाल विचारला जात होता. त्यावर शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं थेट उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार आणि त्यानंतर पुढील पाच वर्षात देखील सत्तेत येणार, असं शरद पवार म्हणाले आहेत.
देशपातळीवर युपीए अध्यक्षपद स्विकारण्याबाबत मी याआधीही अनेकदा नकार दिला आहे. मी वैयक्तिक पातळीवर स्वतः तयार नाही, असेही मी सांगितले आहे. अनेक राजकीय पक्षांकडून मला अध्यक्षपद स्विकारण्याबाबत सांगण्यात येते, पण आमचा राजकीय पक्ष म्हणून तसा सेट अप नाही. देशातील भाजप सोडून इतर समविचारी पक्षाबाबतच्या लोकांची बैठक घेतली पाहिजे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनीही माझ्याकडे केली आहे. मी सगळ्या पक्षांना संपर्क करावा असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार लवकरच गैरभाजप राजकीय पक्षांना मी संपर्क साधणार असल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट केले.