□ आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली गंभीर तक्रार
सोलापूर : एकाच कामासाठी दोनदा एनओसी देण्याचा महापालिकेकडून प्रताप होत असल्याची गंभीर तक्रार भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त शिवशंकर यांची भेट घेतली. आमदार निधी संदर्भातील कामासाठी महापालिकेकडून एनओसी घेतली जाते. मात्र महापालिका प्रशासनाने एकाच कामासाठी दोनदा एनओसी दिल्याचा प्रकार घडत आहे. एकाच कामासाठी दोनदा खर्च कसं काय करता येतो, असा प्रश्न विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर यासंदर्भात चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
आमदार निधीतील विकास कामे करत असताना बी अँड सी किंवा महापालिका या दोन एजन्सीकडून कामे करून घेतली जातात, परंतु महापालिकेकडे एनओसी मागत असताना एकाच कामासाठी दोनदा एनओसी दिल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. आमदार निधीतून काम करत असताना टेंडर काढल्यानंतर संबंधित मक्तेदार त्या ठिकाणी काम सुरू करतो, परंतु त्या ठिकाणी काम करीत असताना त्यापूर्वीच दुसऱ्या एका कामाचीही एनओसी तिथे दिलं गेल्याचं दिसून आलं.
Solapur Municipal Corporation’s honor of giving NOC twice for the same work
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
एका विकास कामासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यासाठी चार महिने कालावधी लागतो. जर एखाद्या ठिकाणी दोनदा ना हरकत प्रमाणपत्र दिले असल्याचे निदर्शनास आले तर पुन्हा तीच प्रक्रिया पार पाडण्यात वेळ जातो. असे प्रकार होऊ नयेत महापालिकेने एकाच कामासाठी एनओसी देताना त्या ठिकाणी काम सुरू नाही याची खातरजमा करूनच संबंधितांना एन ओ सी द्यावी.
याठिकाणी नगरसेवकाचे काम असेल तर त्याची पडताळणी करावी. आमदार निधीतून काम असेल तर त्याचीही खातरजमा करावी, त्यानंतरच एनओसी व्यवस्थित पणे द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.
विनोबा भावे झोपडपट्टीमध्ये माझ्या निधीतून कामासंदर्भात एनओसी महापालिकेने दिले मात्र त्या ठिकाणी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्याही निधीतून काम सुरू असल्याचे दिसून आले, असे प्रकार होऊ नये. अशी सूचनाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.
कुंभार वेस येथील अमृत योजनेचे काम सुरू असताना संबंधित अधिकारी संजय धनशेट्टी यांना तेथे बाजारपेठ आहे, पूर्ण रस्त्याचे काम करा असे सांगितले असतानाही ते काम झालं नाही, मात्र इतर ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत पूर्ण रस्त्याचे कामे केली अशा पद्धतीने दुजाभाव का, असा प्रश्नही आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
गुंठेवारी संदर्भात लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली. त्यावर महापालिका आयुक्त म्हणाले की, मोजणी पूर्ण झालेले आहे ती लवकरात लवकर देतो. उर्वरित गुंठेवारीची मोजणी करून मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी विजयकुमार देशमुख यांना सांगितले आहे.