मोहोळ : अज्ञात जीपने मोटर सायकलला कट मारून घासून गेल्यामुळे एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मोहोळजवळ संत निरंकारी मंडळाच्या इमारती जवळ घडली.
दत्तात्रय रामचंद्र शिवपुजे याचा मृत्यू तर नागनाथ गंगाधर शिवपुजे हे जखमी झाले आहेत. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागनाथ गंगाधर शिवपुजे (रा. वडवळ) व तिरूमला दूध डेअरीमध्ये काम करणारा त्यांचा चुलत भाऊ दत्तात्रय रामचंद्र शिवपुजे ही दोघे रात्री काम आटोपून मोहोळ येथील पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरून परत गावाकडे जात होते.
सोलापूर रोडवर संत निरंकारी मंडळाच्याजवळ आल्यानंतर एका कारला ओव्हरटेक करत जीप पुढे आली व मोटरसायकलला ( नंबर क्रमांक एम एच १३ बी डब्ल्यू ३४९२) कट मारली. यात उजव्या बाजूकडील इंडिकेटर व हँडलला लागल्याने दोघेही खड्ड्यांमध्ये पडले. नागनाथ गंगाधर शिवपुजे गाडी चालवत होता, त्याच्या डाव्या हाताला दंडाला मार लागला व कमरेजवळ मुका मार लागला तर मागे बसलेल्या त्यांच्या चुलत भाऊ दत्तात्रय डाव्या पायास डाव्या बाजूच्या कमरेजवळ डोक्यास मार लागून बेशुद्ध अवस्थेत पडले. यात दत्तात्रय याचा मृत्यू झाला.
जखमीने नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. उपचारासाठी मोहोळ येथे रुग्णालयांमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दत्तात्रय मयत झाला होता घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश शिंदे करत आहेत.
Mohol: One killed and one injured after being hit by a jeep
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ कुरणवाडीत आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह
मोहोळ तालुक्यातील कुरणवाडी गावच्या शिवारात एका २५ ते ३५ वर्षीय तरुणाचा ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजनेचे सुमारास संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात कारणावरून मृत्यू झाल्याबाबतची नोंद करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनगर परिसरातील कुरणवाडी गावच्या शिवारात बिटले ते चिखली जाणाऱ्या रोडनजीक असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एका अनोळखी २५ ते ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह झाडाखाली पडलेला असल्याबाबतची माहिती अनगरचे पोलीस पाटील विठ्ठल प्रल्हाद थिटे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदरचा मृतदेहाची ओळख पटली नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांना माहिती दिली.
४ एप्रिल रोजी रात्री १० : ३० वाजण्याच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदरच्या मृतदेहाची तपासणी करून आजूबाजूच्या परिसरात मृतदेहाबाबत चौकशी केली असता कोणतीही सकारात्मक माहिती मिळवून आली नाही. या प्रकरणी पोलीस पाटील विठ्ठल थिटे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात सदरच्या अज्ञात व्यक्तीचा अज्ञात कारणावरून मृत्यू झाल्याबाबत खबर दिली असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल सचिन मुसळे करीत आहेत.