अमरावती : अमरावतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. येथील बसस्टॅंड मार्गावरील 3 मजली इमारतीत असलेल्या बंद क्लिनिकला भीषण आग लागली. तीव्रता वाढत ही आग तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग क्लासपर्यंत पोहोचली. त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या 400 विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या अग्निशामक गाड्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
बसस्टॅन्ड मार्गावरील तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समधील एका बंद क्लिनिकला भीषण आग लागली. आगीत क्लिनिकमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुसऱ्या मजल्यावरील आगीच्या झळा तिसऱ्या मजल्यावरील कोचिंग क्लासपर्यंत पोहोचल्याने सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’ करण्यात आले. त्या कॉम्प्लेक्समधील २५ ते ३० दुकानदार, तेथील कर्मचारी बाहेर पडल्याने मोठा हलकल्लोळ उडाला. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या पाच बंबांनी ती आग आटोक्यात आणली.
तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये फर्निचरसह वरच्या मजल्यावर काही कोचिंग क्लास आहेत. शुक्रवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील डॉ. प्रकाश विश्वकर्मा यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार उडाला. क्लिनिकला लागून फोम विक्रीचे दुकान असल्याने आगीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोर आली. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने शटर तोडून क्लिनिकमधील ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
खिडक्यांनी झाकलेल्या तिसऱ्या मजल्यावरील बन्सल व अन्य क्लासपर्यंत देखील आगीचा ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यामुळे काही नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावर धाव घेऊन आगीची माहिती दिली. तथा त्यांना सुखरुपपणे बाहेर काढले. बाहेर पडल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला; मात्र बोटावर मोजण्याइतपतच विद्यार्थी होते, असा दावा करण्यात आला.
Fierce fire at closed clinic in Amravati; ‘Rescue’ of 400 students
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शहराचा पारा ४३ अंशांवर पोहोचल्याने या आठवड्यात दररोज आगीच्या घटना घडत आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला रोज १० ते १२ कॉल असून, गुरुवारी देखील सहा ठिकाणी आगी लागल्या होत्या. दरवर्षी उन्हाळ्यात आगीच्या घटना घडल्या की अग्निशमन संसाधनासह फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर येत असतो. नोटीसचा खेळ खेळला जातो; मात्र त्यापुढे काहीही होत नाही. गुजरातमधील घटनेच्या अनुषंगाने शहरात देखील कोचिंग क्लासला फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आले.
शहर कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज व मनपा उपायुक्त सुरेश पाटील यांनी घटनास्थळ गाठून गांभीर्य जाणून घेतले. हवालदिल विद्यार्थ्यांना धीर दिला. संकुलातील कोचिंग क्लाससह अन्य किती आस्थापनांमध्ये अग्निरोधक यंत्रणा आहे की कसे, याबाबत पाटील यांनी अग्निशमन अधीक्षकांना विचारणा केली.
□ कारने घेतला अचानक पेट
अमरावतीच्या इर्विन चौका जवळच्या आयटीआय कॉलेज जवळ उभ्या असलेल्या MH 31 CM 8411 क्रमांकाच्या होंडा सिटी कारची बॅटरी अचानक पेट घेतल्याने आग लागली.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटना झाली तेव्हा कारमध्ये कोणी नव्हते. अग्निशमन दलाने लवकरच आग आटोक्यात आणली. तापमान वाढल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे.