मुंबई : मनसेची ठाण्यात ( 12 एप्रिल) उत्तर सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नास्तिक म्हणून टीका केली होती. आता त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी नास्तिक नाही पण मी माझ्या आस्थेचे प्रदर्शन करत नाही, असे पवार म्हणाले.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक आरोपांना उत्तरे दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घेऊ नका. मला रोज सकाळी लवकर उठावे लागते. मी फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख करतो. कारण हे महापुरुषही शिवरायांचा आदर्श घेऊन काम करायची. मी परवाच्या अमरावतीच्या भाषणात 15 मिनिटे शिवरायांवरच बोललोय. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
एखादी व्यक्ती वर्ष सहा महिन्यात वक्तव्ये बोलल्यानंतर फार गांभीर्याने घेण्यासारखी ही गोष्ट नसते. शिवाजी महाराजांचे नाव घेतले असा उल्लेख राज ठाकरेंनी केला. मी गेल्या काही दिवसांपूर्वीच अमरावतीला गेलो होतो. अमरावतीचे भाषण मागवले तर शिवाजी महाराजांचे योगदान या विषयावर २५ मिनिटांचे भाषण केले आहे. या भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आज मी वृत्तपत्रे वाचली पण वृत्तपत्रे वाचण्यासाठी सकाळी उठावे लागते असाही टोला शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला. फुले आंबेडकर शाहू उल्लेख करतो, त्याचा मला अभिमान आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
या राज्यात शिवछत्रपती यांच्याबाबत सविस्तर वृत्त काव्यातून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात आधी लिहिले. शिवचरित्र, छत्रपतिंवर आस्था असलेले हे तिन्ही घटक आहेत. सत्तेचा वापर कसा करावा ही भूमिका तिघांनीही मांडली. त्यामुळे तिघांच्या विचारांची मांडणी करण्याचाच भाग आहे तो छत्रपतींच्या निमित्तानेही त्यांनी मांडला. म्हणूनच फुले, शाहू, आंबेडकरांचा उल्लेख करतो याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे यांचा माझ्यासमोर आदर्श आहे. आम्ही लिखाण वाचतो. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी सविस्तर मार्गदर्शन करतानाच देव, धर्म याचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर टीका टिप्पणी केली आहे. अशा धर्म, देवाच्या आधारावर गैरफायदा घेणाऱ्या घटकांविरोधात ठोकून काढायचे काम प्रबोधनकारांनी केले आहे. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेले लिखाण हे ठाकरे कुटुंबातील लोक वाचतात असे नसावे. त्यामुळेच अधिक बोलायची आवश्यकता नाही, असाही टोला शरद पवार यांनी राज ठाकरेंना लगावला. अनेक विषय वाचण्यासाठी मी सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचतो, पण त्यासाठी लवकर उठावे लागतो अशीही टोलेबाजी शरद पवारांनी केली.
I am not an atheist; He goes to the temple in Baramati, but does not shout about it: Sharad Pawar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ पुरंदरे आरोपावरही खुलासा
पुरेंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना जिजामातेने शिवाजी महाराजांना घडवले असा उल्लेख टाळला आहे. त्यांना दादाजी कोंडदेव यांनी घडवले असा उल्लेख पुरंदरेंनी केला. या गोष्टीला मी विरोध केला आहे. महाराजाचें व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊने उभ केले, त्या व्यक्तीमत्वाचे मोठेपण आहे. त्यामुळे राजमातेचे योगदान टाळता येणार नाही. बाबासाहेबांनी वेगळे लिहिण्याचे प्रयत्न केला, ते मत योग्य नव्हते यासाठीच माझा विरोध होता. जेम्स लेन पुरंदरेंकडून माहिती घेतली पण या माहितीचा उल्लेख त्यांनी कधीच केला नाही.
□ हल्ल्यामागील सांगितले कारण
घरावरील हल्ल्यामागचं नेमकं कारण आज शरद पवार यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांना मी दोष देणार नाही, ते कामगार आहेत, त्या मागण्यांसाठी ते महिनो महिने बसले होते. त्यांना चुकीचं नेतृत्व लाभलं, चुकीच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीची भाषणं केली ज्या पद्धतीची टीका केली. त्यांच्या टीकेचा रोख एक व्यक्ती असा होता, राज्य सरकारचा उल्लेख नाही, एसटी महामंडळाचा उल्लेख नाही, फक्त सातत्याने माझं नाव घेऊन त्या कष्टकरी कामगारांच्या डोक्यात भरवलं गेलं, त्याचा हा परिणाम आहे आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. माझ्या मते कामगारांना दोष देऊन चालणार नाही, त्यांना रस्त्यावर आणण्याची भूमिका घेणारे जे कोणी घटक असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
》 शरद पवार म्हणाले…
• राज ठाकरेंचे पोरकट आरोप, महागाईबाबत गप्प का हे त्यांनी सांगावं.
• मी फुले-शाहू आणि आंबेडकर यांचे नाव घेतो याचा अभिमान, पण शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा
• राज ठाकरेंनी भाजपबाबत एक अवाक्षरही काढलं नाही, भाजप-मनसेचं काय साटंलोटं आहे माहिती नाही.
• पाच-सहा महिन्यात राज ठाकरे एकदाच बोलतात, तरी त्यांनी मुख्य प्रश्नांना बगल दिली.
• मी बारामतीत मंदिरात जातो, पण त्याचा गाजावाजा करत नाही.
□ ‘पवारांच्या घरावरील हल्ला जर भाजपचे षडयंत्र असेल तर मी राजीनामा देईल’
महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासाठी भाजपला कारणीभूत ठरवले होते. दरम्यान पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हा जर भाजपने घडवून आणला असेल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईन. तसेच मला माझ्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास आहे. भाजप असं कृत्य करुच शकत नाही, असं खासदार रंजितसिंग निंबाळकर यांनी म्हटलं आहे.