‘मेहुण्याच्या कंपनीत 29 कोटी ब्लॅक मनी, मुख्यमंत्र्यांचा संबंध काय?’
मुंबई : हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले? हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आलेत. बहुतेक चतुर्वेदीच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्त्यावर रजिस्टर आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याबाबत किरीट सोमय्या यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित बांधकाम प्रकल्पात काळ्या पैशांचा वापर झाला आहे, यात 29 कोटी रुपये काळा पैसा गुंतवला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय आहे? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान, आज आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार, पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी ठाकरेंवर आरोपांची तोफ डागली. सोमय्यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. ठाकरे कुटुंबीयांच्या एका कंपनीचा घोटाळा उघड करू, असा इशारा त्यांनी काल दिला होता. अशातच, सोमय्यांनी आरोप करण्याआधीच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्यांवर घोटाळ्याचा आरोप केला. युवा प्रतिष्ठाननं बांधलेल्या शौचालयात घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्तावर रजिस्टर आहेत. ते चतुर्वेदी गायब आहेत, त्यांना फरार घोषित करावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
येत्या काळात त्यांना कोर्टातून वॉरंट निघेल अशा विश्वास आहे. आदित्य आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा व्यवहार आहे हे मी आधी सांगितलं होतं, असंही सोमय्या म्हणाले.
Kirit Somaiya commits Rs 100 crore toilet scam ‘Where did the Chief Minister hide Nandkishore Chaturvedi? – Kirit Somaiya
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोमय्या यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.
□ पत्रकार परिषदेत एकापाठोपाठ एक आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.
1. हवालाकिंग असल्याचा आरोप असणारे नंदकिशोर चतुर्वेदींना कुठं लपवलंय?
2. नंदकिशोर चतुर्वेदींना फरार का घोषित करत नाही?
3. मेहुणे पाटणकरांच्या ‘थ्री-जी होम’शी संबंध नाही, हे ठाकरे जाहीर करणार?
4. माझ्याविरोधात तक्रार दाखल करणारे प्रवीण कलमे आहेत कुठे?
5. प्रवीण कलमे यांना आव्हाड की, अनिल परब वाचवत आहेत?
□ किरीट सोमय्यांनी केला शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत आता सोमय्या यांचा टॉयलेट घोटाळा आपण बाहेर काढणार आहोत, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. हा शंभर कोटींचा घोटाळा आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट केले, त्यावरुन संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “काल त्यांनी माननीय पवार साहेब यांच्यावर ट्विट केलं एखादा त्यांनी आयएनएस विक्रांत वरती करावं आम्ही काढणार आहोत, शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा आहे” असाही आरोप त्यांनी केला.
भाजपच्या नेत्यांनी कितीही दावा केला असला तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, उलट किमान पुढले पंचवीस वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, “लवकरच मी या महाशयांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा घोटाळा केला आहे. कुठे कुठे पैसे खातात तर विक्रांत पासून टॉयलेटपर्यंत. ही सगळी कागपत्र सुपूर्द झाली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची संस्था हे लोकं चालवत होते, त्यांचं कुटुंब चालवत होते. त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला. मला पाहून हसायलाच आलं. खोटी बिलं, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे पैसे कसे काढले हा घोटाळा लवकरच बाहेर येईल, तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा,” असं राऊत म्हणाले.
“राकेश वाधवनची जमीन तुमच्या मुलालाच कशी मिळाली याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी ज्याच्यावर दबाव आणून जमीन हडपली. त्या जमिनीवर शेकडो कोटींचे प्रकल्प तुमच्या मुलाने उभे केले, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करतंय. तपासाला आता सुरुवात झाली आहे. अनेक घोटाळे बाहेर येतील,” असं राऊत म्हणाले.