सांगली : कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने तपासणी केली असता तब्बल 55 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या.
या पथकाने आतापर्यंत 72 देयकांची तपासणी केली असून 3 लाख 21 हजार रूपयांची तफावतीची रक्कम संबंधितांना परत करण्याबाबत आदेश केले आहेत. रूग्णालयांनी औषधाच्या व तपासणीच्या पावत्या सादर न केल्याने 5 लाख 91 हजार रूपयांची देयके आक्षेपाधीन ठेवली आहेत. लेखा तपासणीनंतर देयकांमध्ये अनियमतेबाबत विविध रूग्णालयांना 18 नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विविध रूग्णालयांतील 55 देयकांमध्ये तफावत आढळून आली आहे. याबाबत भारती हॉस्पीटल, कुल्लोळी हॉस्पीटल, मिशन हॉस्पीटल, घाडगे हॉस्पीटल, सेवासदन व मेहता हॉस्पीटल यांना विविध प्रकरणी 18 नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांचा खुलासा समाधानकारक नाही आणि अतिरिक्त बिलाची रक्कम जी रूग्णालये रूग्णांना परत करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
सदर लेखा तपासणी पथक देयकांच्या अनुषंगाने नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयु चार्जेस, रूम रेंट, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सीजन, औषधे आदिंच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे. लेखा तपासणी पथकाने आत्तापर्यंत 30 लाख 45 हजार रूपयांच्या 72 देयकांची तपासणी केली असून यामध्ये 55 देयकांमध्ये तफावत आहे. यामधील 3 लाख 21 हजार 565 इतकी तफावतीची रक्कम आहे. तर 5 लाख 91 हजार 149 रूपये आक्षेपाधीन देयकांची रक्कम आहे.