मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येपेक्षाही मला शेतक-यांच्या आत्महत्येची चिंता आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
वाय वी चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि शरद पवार यांची काल बुधवारी भेट झाली. त्यानंतर पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुशांत आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. एके दौ-याठिकाणी आपला हात धरुन एका शेतक-याने या विषयावर कैफियत मांडल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ते म्हणाले, एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच, राज्यात शेतक-यांच्या एवढ्या आत्महत्या होतात त्याकडे कोणी लक्ष देत नाही. माध्यमंदेखील त्याची नोंद घेत नाही.
सुशांतसिंह आत्महत्या चौकशी प्रकरण सीबीआयला सोपवण्यावरून शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.