सोलापूर : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. त्यासाठी 424 कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलीस पथकाने मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.
सोलापूर जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. कृषी औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख अधिक दृढ होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. शेती आणि शेतकरी सक्षम व्हावे यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, कृषि यांत्रिकीकरण, गट शेतीस प्रोत्साहन, मागेल त्याला शेततळे या योजनाना चांगले यश मिळत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य, महानगरपालिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.