□ सोलापूर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
□ ऑनलाइन जमा केला पगार परस्पर घेतला काढून आणि हातात दिले निम्म्या पगाराचे रोख रकमेचे पाकीट
□ अन्यथा मंगळवारपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
सोलापूर : घंटागाडी चालक व बिगारी या सुमारे 460 कामगारांच्या पगार वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची बाब समोर आली आहे. या कामगारांना ऑनलाइन पगार जमा करून अवघ्या दहा मिनिटात ठेकेदार संस्थेने काढून घेतले आणि कामगारांच्या हातात निम्म्या पगाराचे रोख रकमेचे पाकीट देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. कामगार संघटनेने तक्रार करूनही याकडे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप होत आहे. Corruption in salaries of hourly workers; Solapur Municipal Corporation warns of strike action by employees
दरम्यान, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने बुधवारी (ता.27) सायंकाळी घंटागाडी कामगारांना नियमानुसार वेतन पूर्णपणे द्यावे, कोणतीही परस्पर कपात करू नये यासह विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले. त्यावर सोमवारी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले. सोमवारी निर्णय न झाल्यास त्यानंतर मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने घंटागाडी कामगारांना काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशारा अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी दिला आहे.
सोलापूर महापालिकेने शहरातील कचरा संकलनाचा मक्ता विविध सहा ठेकेदारांना दिला आहे. सुमारे 460 बिगारी व चालक या घंटागाड्यांवर कार्यरत आहेत. करारानुसार घंटागाडी वाहन चालक प्रति माहे प्रति व्यक्ती 15 हजार 404 रुपये पगार आहे. घंटागाडी बिगारी प्रति माहे प्रति व्यक्ती -13 हजार 632 रुपये, ट्रॅक्टर वाहन चालक प्रति माहे प्रति व्यक्ती – 16 हजार 585 रुपये, पहारेकरी नियंत्रण कक्ष सेवक प्रति माहे प्रति व्यक्ती 13 हजार 632 रुपये, सुपरवायझर प्रति माहे प्रति व्यक्ती 15, हजार 404 रुपये पगार आहे. मात्र घंटागाडीवरील चालक व बिगारी यांना पूर्ण पगार न देता निम्म्याहून कमी पगार नियमबाह्यपणे दिला जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590979069246493/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
घंटागाडी वरील या चालक व बिगारी कर्मचाऱ्यांना बडोदा बँकेमध्ये खाते खोलण्यास लावले आहे. खाते खोलले मात्र या कामगारांचं पासबुक एटीएम, चेकबुक हे सर्व संबंधित कामगारांच्या घरी जाण्याऐवजी ठेकेदारांच्या संस्थेच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. या कामगारांचे एटीएम, चेक बुक संबंधित ठेकेदार संस्थाच वापरत असल्याचा गंभीर आरोप या कामगारांनी व संघटनेने केला आहे.
घंटागाडी कामगारांच्या या चेकबुक व एटीएमचा वापर करून परस्पर त्यांचा निम्मा पगार ठेकेदार संस्था काढून घेते. या महिन्यातील पगार वाटपात तर तीन व सात झोन मधील संबंधित मक्तेदाराने कहरच केला. घंटागाडी कामगारांच्या खात्यावर ऑनलाईन सुमारे साडेतेरा हजार रुपये वेतन जमा केला आणि अवघ्या दहा मिनिटातच परस्पर सर्व रक्कम काढून घेतली.
यामुळे संबंधित कामगारांच्या खात्यावर शून्यच रुपये शिल्लक राहिले. त्यानंतर संबंधित घंटागाडी कामगारांना प्रत्यक्ष बोलवून या मक्तेदारांनी त्यांच्या हातात रोख रकमेचा पगार बंद पाकिटात दिला. मात्र या बंद पाकिटामध्ये संपूर्ण पगार ऐवजी निम्माच पगार रोख रकमेत देण्यात आला आहे. काही जणांना तर त्या बंद पाकिटावर नमूद केलेली रक्कम त्यापेक्षाही चार-पाचशे रुपये कमीच पैसे अदा केले आहेत असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे संबंधित मक्तेदारांना महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
□ एटीएम, पासबुक व चेकबुक हे संबंधित खातेदारांऐवजी मक्तेदाराच्या पत्त्यावर !
वास्तविक पाहता संबंधित बँकेने नियमानुसार कामकाज करणे गरजेचे आहे मात्र याकडे संबंधित बँकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. खातेदारांचे एटीएम, पासबुक व चेकबुक हे संबंधित खातेदारांनाच मिळाले पाहिजे. वास्तविक पाहता बँकेच्या दुर्लक्षामुळे हे थेट मक्तेदारांकडेच जमा केले जाते याचा अर्थ काय असा सवाल उपस्थित होत आहे.
यावरून मंजूर वेतनापेक्षा निम्माच पगार अदा करणे तसेच कामगारांच्या खात्यावरून परस्पर एटीएम व चेकबुकच्या आधारावर पैसे काढून घेणे हा भ्रष्टाचार नव्हे तर मग काय असा आरोप कर्मचारी व कामगार संघटनेने केला आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दर महिन्याला दहा तारखेच्या आत नियमानुसार काम केलेला वेतन पगार अदा केला जावा अशी मागणी या ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले , सायमन गट्टू, श्रीनिवास रामगल, योहवान कानेपागुलू यांनी केली आहे.
यावेळी युनियनचे पदाधिकारी, घंटागाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591032429241157/