पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच यावर अजित पवार यांची भूमिका काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणलंय, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचं टाळलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, काल शनिवारी पार्थ पवार एकटेच काका श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांच्या भेटीला गेले होते. पवार कुटूंबियांकडून पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पार्थ पवारांनीही काल माध्यमांशी बोलणे टाळले, याविषयावर काही बोलायचं नसल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे.
अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
* आज कथित वादळ शमण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. तसेच ते विविध विकासकामांची करणार पाहणी करणार आहेत. यादरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आढावा बैठक घेतील आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ देतील. मात्र त्याचवेळी ते कुटुंबात निर्माण झालेल्या तणावाबाबतही घरातील सर्व सदस्यांची चर्चा करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यानंतर तरी पवार कुटुंबात निर्माण झाले कथित वादळ शमण्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.