सोलापूर – सोलापूर रेल्वे स्थानकात थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना विद्युत तारेचा शॉक बसल्याने १७ वर्षाचा तरुण भाजून जखमी झाला. ही दुर्घटना बंद असलेल्या कॅबिन जवळ आज रविवारी (ता.28) सायंकाळच्या सुमारास घडली. Youth injured while taking selfie on train in Solapur, readiness of railway police
मुकसित मुजाहिद जमादार (वय १७ रा. सिद्धेश्वरपेठ सोलापूर) असे भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो रेल्वे स्थानकातील बाळेच्या दिशेकडील कॅबिन जवळ एका थांबलेल्या मालगाडीवर चढून मोबाईलने सेल्फी घेत होता.
याचवेळी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तो खाली कोसळून भाजला. त्याला गंभीर अवस्थेत रेल्वे पोलीस आणि मतीन बांगी यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले . जखमी जमादार हा अकरावी इयतेत शिकत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे.
□ सूर्या हॉटेलजवळ कोयत्याने हल्ला करून जखमी
मेकॅनिक चौकातील सूर्या हॉटेल जवळील बोळात अपघाताच्या किरकोळ भांडणातून कोयत्याने पाठीत वार केल्यामुळे आकाश मुरलीधर नागणे (वय २५ रा. निराळे वस्ती) हा जखमी झाला. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संकेत शिंगारे, पवन गवळी आणि अन्य तिघा जणांनी मारहाण केल्याची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूर – पुणे महामार्ग बनला हवाला रॅकेटचा मार्ग; सात पथके तैनात
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे गोळीबार करून लुटलेली 3 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम हवाला रॅकेटची असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या महामार्गावरून गुटख्याच्या अवैध वाहतुकीनंतर आता हवाला रॅकेट सुरू असलेल्या शक्यतेला दुजोरा मिळत आहे. या महामार्गावरून नेहमीच अवैध वाहतूक होत असल्याने पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. या लुटूपुटू कारवाया करण्यात पोलिस प्रशासन व्यस्त असून, कोट्यवधी रुपयांचे हवाला रॅकेट मस्त सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. काळा पैसा म्हणजेच कर चुकवून जमा केलेली माया एका भागातून दुसर्या भागात पोहोचवायचे. त्यासाठी बँकांची गरज नाही किंवा करन्सी एक्स्चेंजचीही गरज नाही. कुठला फॉर्म भरायला नको की शुल्कही लागणार नाही. गरज असते ती केवळ पैसे पाठवणारा, पैसे स्वीकारणारा आणि दोन मध्यस्थ यांची. यालाच ‘हवाला’ असे म्हणतात.
कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून मुंबईकडे हवाला रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जात असल्याचे बोलले जात आहे. ऑगस्ट 2021 मध्ये देखील याच महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथे एसटी बसमधून लाखो रुपये लूट केल्याची घटना घडली होती. त्या वेळी देखील ते पैसे हवालामार्फत चालले असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर शुक्रवारी (दि. 26) गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटल्याने ही दुसरी घटना समोर आली आहे. ज्या वेळेस असे लूटमारीचे प्रकार घडतात, तेव्हाच अशा घटना समोर येतात, इतर वेळेस मात्र हवाला रॅकेट सुरू असल्याचे कोणतेही धागेदोरे किंवा खबर पोलिसांना मिळत नाही.
इंदापूर येथे गोळीबार करून लुटलेली रक्कम नेमकी कोणाची आहे? ती कुठून कुठे चालली होती? दरोडेखोर कोणत्या दिशेने फरार झाले? याबाबतचा तपास इंदापूर पोलिसांची सात पथके करत असून, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. या घटनेवर ते बारकाईने लक्ष देऊन तपासाची चक्रे गतिमान करण्यासाठी सूचना करत आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने तपास कार्यासाठी सात पथके 24 तास तैनात केली असून, तपास कार्य वेगाने सुरू आहे. लवकरच या घटनेचे धागेद्वारे हाती लागतील, असे इंदापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी माध्यमांना सांगितले.