मुंबई : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी खेळी करण्याचा डाव घातला असून दसरा मेळाव्याला प्रमुख व अथिती म्हणून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. Dussehra gathering: Eknath Shinde’s move to cheer Uddhav Thackeray, Sharad Pawar’s advice is political
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख आणि शान असलेल्या दसरा मेळाव्याबाबत एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीचा अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कोणत्या गटाला परवानगी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
५६ वर्षांपासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसैनिकांना नवा कार्यक्रम द्यायचे. त्यामुळे शिवसैनिक दरवर्षी न चुकता विचारांचे सोने लुटण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर आवर्जून यायचे.
मात्र, आता महानगरपालिकेने शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यास बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पत्ता आपोआप कट होईल. परंतु, ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरण अतूट असल्याने त्यावरुन रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून चाणाक्षपणे एक डाव टाकण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना आमंत्रण देतील. त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे घराण्याचा वारसा सांगणाऱ्या व्यक्तीची उणीव जाणवणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठे वादळ आले असून सर्वच गोष्टींवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. पक्ष, चिन्ह, वारसा याबरोबरच दसरा मेळावा कोण घेणार यावरून एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे समोरा-समोर उभे ठाकले आहेत. यावर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायलय आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. शिवसेना आणि दसरा मेळाव्याचे एक घट्ट नाते आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी जो गट मेळावा घेईल तो गट कोर्टात पुरावा म्हणून वापर करतील म्हणूनच दोन्ही गट मेळाव्यासाठी आग्रही झाले आहेत.
दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. गणेश चतुर्थीनंतर दसऱ्याला शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईतच राहावे, अशा सूचना आमदारांना एकनाथ शिंदेनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
□ यात शरद पवारांचा सल्ला
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले आहेत. अशात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी सध्या सुरू असलेल्या दसरा मेळावा मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असे शरद पवार म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे.’, अशी भूमिका श्री. पवारांनी मांडली. त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरून सामोपचाराने वाद सोडवणे शक्य होईल.” दसरा मेळावा कोणाचा होणार हा वाद सुरु असतानाच पवारांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे ते स्वतः आता ठाकरेंना दसरा मेळावा घेण्याची संधी मिळावी, यासाठी मैदानात उतरले आहेत का? अशीही चर्चा होत आहे.
ज्यांच्या हातात पॉवर असते, ते त्याप्रमाणे गोष्टी करतात. यातून पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. शेवटी जनता कोणाच्या पाठीशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यावरच लक्षात येईल.”, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे म्हटलंय आहे.