□ आबा- दीदी यांच्यात होणार दिलजमाई
सोलापूर : उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. शिवसेना नेत्या रश्मी बागल या शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. बागल या 2019 मध्ये सोलापुरच्या करमाळ्यातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी रश्मी बागल यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, रश्मी या माजी सहकार राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या आहेत. Sawant’s courtesy: Shock to Thackeray, another leader on the way of Shinde group Karmala Rashmididi Narayanaaba
सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नवा धमाका झाला. त्याचा हादरा ‘बारामती’लाही बसला. करमाळ्याच्या राजकारणात आणि साखर कारखानदारीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे माजी आमदार नारायण (आबा) पाटील रश्मी (दीदी) बागल यांच्यात दिलजमाई होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तथा सोलापूरच्या राजकारणाशी संबंधित असणारे प्रा. तानाजी सावंत यांनी केलेली शिष्टाई फलदायी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. २०१९ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास ठेवत करमाळ्याची उमेदवारी दिली त्या रश्मी बागल यादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी रश्मी बागल यांनी भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात यापुढे आबा व दीदींनी एकत्रित काम करण्याची सूचना सावंतांनी रविवारी पुण्यात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत केल्याचे सांगण्यात येते. आदिनाथसाठी दीदींनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटाशी घरोबा केल्याचे मानले जात आहे. बंद स्थितीत असलेल्या आदिनाथसाठी ही एक नवलाई प्राप्त झाल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आदिनाथ कारखाना भाडे तत्त्वावर द्यायचाच नाही, असा चंग आबा व दीदींनी बांधलेला होता. सभासदही त्यांच्याच बाजूने होते तरी देखील हा कारखाना बारामतीचे दिग्गज असणारे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला देण्याचा ठराव केला गेला होता. आदिनाथच्या प्रश्नावरून वरिष्ठ स्तरावर लढाई सुरू आहे. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गडगडल्यानंतर राज्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणाची चक्रेही फिरू लागली.
बारामतीकरांना शह देण्यासाठी आदिनाथ सहकार तत्त्वावर सुरू करण्याच्या हालचाली तातडीने सुरू झाल्या. आदिनाथ कारखाना ओटीएस प्रक्रियेत बसवल्यानंतर सावंत यांनी तातडीने नऊ कोटी रुपये गेल्या आठवड्यात भरूनही टाकले. त्यामुळे आदिनाथ सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाच शिवाय पवार यांचे भाडे तत्त्वावरील मार्ग रोखले गेले.
या साऱ्या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात सावंत यांच्या कार्यालयात आदिनाथच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आबांसह दीदी व अनेक मान्यवर त्याला उपस्थित होते. यंदा आदिनाथचा भोंगा वाजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून यंदाचा हंगाम कसा यशस्वी करायचा याविषयी या बैठकीत रणनीती ठरवली गेली, असे सांगण्यात आले. या माहितीला माजी संचालक नवनाथ झोळ यांनी दुजोरा दिला. राज्यात सत्तांतर झाल्यापासून आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याचा जो प्लॅन आखला होता, तो हाणून पाडण्यासाठी आबांनी पुढाकार घेतला होता, त्यात त्यांना यश आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रश्मीदीदींनी देखील हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. हा कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सावंत यांनी त्यांच्या मागे ताकद उभी केली. मोलाची मदत केली. आबांनी कारखाना स्थळावर जाऊन शनिवारी (ता. ३ सप्टेंबर) कारखान्याची पाहणी करून कामकाजही सुरू केले आहे. हंगामाची चर्चा करण्याबरोबरच सावंत यांनी या बैठकीत दोघांमध्ये एकी घडवण्याची पुण्याच्या बैठकीत संधी साधली, असे सांगण्यात येते. आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल हे यावेळी उपस्थित होते, असेही सांगण्यात आले.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आबांच्या गटाचे देवानंद बागल म्हणाले की- आदिनाथ बारामती अॅग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, तीन वर्षे बारामती अॅग्रोने हा कारखाना सुरू केला नाही. हा करार चुकीच्या पध्दतीने झाले असल्याचे लक्षात आल्याने बागल यांनी देखील बारामती अॅग्रोच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. हा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा; म्हणून आपण पाठपुरावा केला यात आम्हाला यश आले.
सध्या कारखाना बागल गटाच्या ताब्यात आहे, त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बागल आणि आम्हाला बैठकीसाठी बोलावली होते. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखान्याचे गाळप झाले पाहिजे, यासाठी सावंत यांच्या उपस्थितीत आमची बैठक झाली. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदिनाथ कारखान्याचे कामकाज सुरू होणार आहे, असे देवानंद बागल यांनी स्पष्ट केले.
□ एकीचे संकेत
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच आबांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवलेल्या दीदींनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून बागल आणि पाटील एकत्र येणार, अशा चर्चा कधी सोशल मीडियातून, तर कधी जनतेमधून ऐकायला मिळत होती. मात्र सावंत यांच्या माध्यमातून हे दोन्ही गट एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे.
□ रश्मीदीदी कोण आहेत ?
रश्मी बागल या दिवंगत माजी सहकार राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या आहेत. दिगंबरराव बागल हे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर रश्मी बागल यांच्या आई शामल बागल यांना राष्ट्रवादीनं आमदार केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. परंतु २५७ मतांनी त्यांचा पराभव झाला. रश्मी बागल या सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिकादेखील आहेत. २०१९ मध्ये रश्मी बागल यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
२०१९ विधानसभा निवडणुकीत रश्मी बागल या करमाळ्यातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांच्याविरोधात माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी मतात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे आमदार म्हणून निवडून आले.
त्यात नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत. त्यातूनच पुण्यातील घरी तानाजी सावंत यांनी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली. माजी आमदार नारायण पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात रश्मी बागल यांनाही आपल्या बाजूने करून सोलापुरात राष्ट्रवादीला शह देण्याचा शिंदे गटाचा मानस आहे.
□ गजानन कीर्तिकर शिंदे गटात ?
#mp #shivsena #शिवसेना #सुराज्यडिजिटल #surajyadigital
उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील व्हायची शक्यता आहे. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. कीर्तिकर हे स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. यांमुळे ही समिती सुद्धा शिंदेगटात येऊ शकते. कीर्तिकर शिंदे गटात आल्यास आणखी एक खासदार शिंदे गटात दाखल होईल.