□ पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. मंत्री तानाजी सावंत गेल्या आठवड्यात पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्यावर पंढरपूर येथील त्यांच्या पुतणे अनिल सावंत यांच्या घरी कल्याण काळे यांनी भेट घेतली. त्यामुळे कल्याण काळे एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. NCP leader Kalyan Kale met Minister Tanaji Sawant
विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर कल्याण काळे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेते मंडळींचे भाजपमध्ये जोरदार इनकॉमिनग सुरू होते. त्यावेळी कल्याण काळे यांनी काँग्रेसचा हाथ सोडून आणि विठ्ठल परिवाराची साथ सोडून भाजपवासी झाले होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माढा विधानसभेची जागा काँग्रेसला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कल्याणराव काळे शिवसेनेत गेले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे ठरवल्यावर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले होते. कल्याणराव काळे फार फार दिवस शिवबंधनात राहिले नाहीत. त्यांनी लगेच घर वापसी केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक गणितासाठी कल्याणराव काळे यांना अनेकवेळा पक्षांतर करण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे गिफ्ट म्हणून सरकारने त्यांच्या साखर कारखान्याला थकहमी देखील दिली होती. असे असताना त्यांच्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी हंगाम संपत असताना आरआरसीची कारवाई केली होती.
एक महिन्यावर ऊस हंगाम येऊन ठेपला असताना कल्याणराव काळे यांनी मंत्री तानाजी सावंत यांची घेतलेली भेट, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातून एकनाथ शिंदे गटात कोणाला घ्यायचे याचे सर्व अधिकार हे मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.
“गेल्या आठवड्यात तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यामागे कोणतेही राजकारण नाही. मी सदिच्छा भेट घेतली होती”
– कल्याणराव काळे, चेअरमन – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना