पंढरपूर – ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आजकाल माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची खूप चिंता लागली असल्याचे दिसत आहे. पण त्यांचे जास्त ऐकल्यामुळेच ठाकरे यांच्या शिवसेनेची आज ही अवस्था झाली असल्याचा टोला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. This state of Shiv Sena is due to listening to Sharad Pawar – Shambhuraj Desai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी शंभूराज देसाई आज पंढरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, महेश साठे आदी उपस्थित होते.
सोमवारी कुर्डूवाडी येथे आलेल्या खासदार शरद पवार यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांनाच असल्याचे वक्तव्य केले होते. या विषयावर बोलताना शंभूराज देसाई यांनी, पवारांचे जास्त ऐकल्यामुळे शिवसेनेवर ही वेळ आली असल्याचे आमचे सर्वांचे मत आहे या शब्दात टीका केली.
तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराचे सोनं लुटण्याचा अधिकार केवळ आम्हालाच असल्याचा दावा केला. कारण राज्यातील सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांनी भाजपाबरोबरील नैसर्गिक हिंदुत्व विचाराची युती तोडली आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस बरोबर अनैसर्गिक युती केली. राज्यातील जनतेला देखील ते मान्य नव्हते. यामुळेच दोन दिवसापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहिला असता भाजपा व शिंदे गटाच्या शिवसेनेला सर्वात जास्त जागा देवून जनतेने कौल दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उध्दव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे चौथ्या क्रमांकावर गेली असल्याची टीका त्यांनी केली. केवळ अडीच ते तीन महिन्याच्या कामावर आम्हाला हे यश मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना देसाई यांनी, आरक्षण व इतर प्रश्नाबाबत मंत्रिमंडळाची एक उपसमिती नियुक्त करण्यात आली आहे. याव्दारे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे. यापूर्वी मराठा समाजाचे प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी हाताळले आहेत. आता देखील शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध मंत्री त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहेत. हे सरकार मराठा आरक्षण व त्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्कव्दारे महसूल वाढविण्याबाबत माझ्याकडे अनेक योजना असून लवकरच याचे परिणाम सर्वांना दिसतील, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. तसेच राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असणार्या पंढरपूर येथे मद्य व मांस विक्रीस बंदी करावी अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे, ही बाब तपासून घेवू असे उत्तर शंभूराज देसाई यांनी दिले.