□ शिवाचार्यांचे नाव काढताच देशमुखांची गांधीगिरी
□ महास्वामींना खासदार केल्याचा आता होतोय पश्चात्ताप
• सोलापूर / शिवाजी भोसले
गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जय सिध्देश्वर महास्वामी यांना सोलापूरचे खासदार करण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिलेले सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हेच आता महास्वामी यांच्या कारभाराला वैतागले असून महास्वामी यांचे नाव काढताच देशमुख हे हात जोडताहेत. The owner himself was fed up with Mahaswami’s management, Vijay Deshmukh Jayasiddheshwar Mahaswami Solapur
महास्वामींना खासदार केल्याचा म्हणे आता मालकांना खूप पश्चात्ताप होत आहे, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. महास्वामींच्या प्रकरणात होत असलेल्या पश्चातापाबद्दल खुद्द देशमुख हे आपल्या अत्यंत निकटवर्तीयांकडे व्यथा बोलून दाखवत आहेत. शिवाय महास्वामींच्याबद्दल तक्रारी घेऊन गेलेल्या संबंधितांकडे देखील देशमुख आपल्या भावना व्यक्त करत असल्याचे कळते.
दोन देशमुखांच्या गटा – तटाच्या लढतीमध्ये आपल्या केवळ गटाचाच नव्हे तर आपल्या खास मर्जीमधील खासदार असावा यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी पुणेरी चेहरा अमर साबळे यांना सोलापूरचा खासदार बनविण्यासाठी घाट घातला. त्यासाठी आपली सगळी शक्ती सुभाष देशमुखांनी पणाला लावली होती. त्याचदरम्यान सुभाष देशमुख यांच्या याच फार्म्युल्याचा विचार करत, आमदार विजयकुमार देशमुख यांनी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना खासदार करण्याचा चंग बांधला. या दरम्यान महास्वामी यांची पुण्याई फळाला आली. विजयकुमार देशमुख यांनी महास्वामींसाठी टाकलेल्या सोंगट्या उजव्या पडल्या.
गौडगावच्या मठामधील मठाधीश सोलापूरचे खासदार झाले. शिवाचार्य खासदार होण्यात विजयकुमार देशमुख मालकांचा सिंहाचा वाटा राहिला. मात्र, महास्वामी यांच्या कारभाराबद्दल विजयकुमार देशमुख हेच नापसंती व्यक्त करत आहेत, असे समजते. महास्वामींचा विकास कामांविषयी मतदारांना भेटण्याच्याबाबतीत जो नकारात्मक कारभार आहे, तो देशमुखांना खटकत आहे, अशी खुद्द चर्चा देशमुखांच्या संपर्क कार्यालयात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महास्वामी नागरिकांना भेटत नाहीत. मोबाईल रिसीव्ह करत नाहीत. त्यांचा मोबाईल रिसीव्ह झाल्यास ते पूजेत आहेत, कामात आहेत, विश्रांती घेत आहेत, अशी उत्तरे नागरिकांना मिळतात. त्यातून नागरिकांची कामे अडली आहेत. अडलेले नागरिक जेव्हा विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना महास्वामींबद्दल सांगतात, त्यावेळेस आमदार देशमुख हे महास्वामींबद्दल हात जोडून नाराजी व्यक्त करत असल्याचे नागरिक सांगतात.
□ अडवली अरळी पुलाची शिफारस
दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांना जोडणारा पूल अरळी इथे उभारण्याचे प्रस्तावित आहे. अंदाजे ४० कोटींचा खर्च या पुलाच्या उभारणीसाठी अपेक्षित आहे. दोन तालुक्यांचा विचार करता या पुलाची उभारणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुलाच्या मंजुरीसाठी दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख, मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अन्य जणांच्या शिफारशी मिळाल्या आहेत.
तथापि, महास्वामी यांनीच खुद्द या पुलाची शिफारस अडविल्याचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज बगले यांनी सांगितले. या पुलाच्या शिफारशीसंदर्भात महास्वामींकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. पाहतो, माहिती घेतो, अभ्यास करतो, अशी उत्तरे महास्वामी यांच्याकडून मिळत असल्याचेही बगले यांनी सांगितले.
□ मतदार वैतागले
महास्वामींचे संपर्क कार्यालय हे शेळगीला एका कोपऱ्यात, कोनाड्याला मठात आहे, संपर्कासाठी तिथे जाणे गैरसोयीचे आहे, शारीरिक मानसिक व आर्थिकदृष्ट्या ते त्रासाचे आहे. संपर्क कार्यालयात महास्वामी भेटत नाहीत, तिथे भेटण्याची त्यांची निश्चित वेळ नाही. संपर्क कार्यालयातील कर्मचारी हे महास्वामींच्या भेटण्याबद्दल नीट सांगत नाहीत. अनेक सबबी सांगून नागरिकांना परत पाठवून देतात, असा प्रत्यक्ष भेटायला जाणाऱ्यांचा अनुभव आहे.
गौडगावला मठात भेटायला गेले तरी तिथेही महास्वामी भेटत नाहीत. सोलापूरला गेलेत, दिल्लीला गेलेत, त्यांच्याकडे महाराज लोक आलेत भेटणार नाहीत, पूजा सुरु आहे, वेळ लागेल, विश्रांती घेत आहेत. उशीर लागेल. पुन्हा या असे म्हणून मठातून मतदारांना पिटाळून लावले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, खासदार महास्वामी म्हणजे ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही अशा प्रतिक्रिया अनेकांनी ‘सुराज्य’कडे व्यक्त केल्या.