□ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी साधला महिलांशी संवाद
सोलापूर : देशभरामध्ये आज महागाईचा भस्मासुर वाढला आहे. महागाईने महिलांचे किचेन बजेटसुद्धा पूर्णपणे कोलमडून पडले आहे. सिलेंडरच्या किंमती १ हजार पार गेल्या आहेत. सबसिडीचा कोंडमारा झाला आहे. महिलांसाठी ही सर्वात मोठी महागाईची झळ आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किंमती कमी करण्यासाठी आपण संसदेत आवाज उठवू, असे आश्वासन संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले. Solapur: Will raise voice to reduce cylinder prices – MP Supriya Sule political
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल आणि अर्बन सेलच्यावतीने शहराध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी गुरुवारी सायंकाळी दमाणी नगर येथील गडदर्शन समाज मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त बचत गट आणि विविध क्षेत्रातील महिलांसाठी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार आणि त्यांच्या पत्नी गीताताई पवार यांनी पवार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत केले. कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश चंद्रकांत पवार यांनी सांगितला. यावेळी खासदार सुप्रियाताई यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याबरोबरच आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिला. महागाई, दरवाढ, बेकारी, उद्योग व्यवसायाला प्राधान्य, बचत गटाची समस्या, शिक्षण, वैद्यकीय आदी क्षेत्रातील महिलांनी विचारलेल्या प्रश्नाला प्राधान्य देतानाच याबाबत आपण गांभीर्याने विचार करू असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
महिलांशी संवाद साधल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी गडदर्शन कॉलनीतील सत्यनारायण बिडला, श्रीमती शोभा बिडला, कविता बिडला आणि शैलेश बिडला कुटुंबाने सुरू केलेल्या फूड प्रॉडक्ट कारखान्याला भेट दिली. या ठिकाणी महिलांच्या हाताला काम मिळत असल्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर चंद्रकांत पवार कुटुंबीयांच्यावतीने खासदार सुप्रियाताई यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
गडदर्शन सोसायटीचे चेअरमन शिवदास चटके यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नलिनी चंदेले, विद्या शिंदे, सायरा शेख, लता ढेरे, सिया मुलाणी, अनिता गवळी, प्रिया पवार, दीपक राजगे, सिकंदर गोलंदाज, शिवदास चटके सर, अनिल गायकवाड, श्याम गांगर्डे, सुरेशसिंग पवार, युवराज सलगर, अमर गरड, अजय जगताप, प्रभाकर मोरे, सूर्यकांत पवार, शंकर काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ एकनाथ शिंदेंना संघटना, चिन्ह चालते मग शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आणि नातू का चालत नाही?
पारनेर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खालच्या पातळीवर जाऊन असंस्कृत राजकारण करीत आहेत. त्यांना शिवसेनाप्रमुखांचे नाव चालते, संघटना, चिन्ह चालते, तर मग त्यांचा मुलगा आणि नातू का चालत नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत दहा वर्षे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली. असे असताना त्यांच्याकडून पक्ष संघटना, संघटनेचे नाव, शिवसेनाप्रमुखांचे नाव, पक्षचिन्ह ओरबाडण्याचा प्रयत्न करणे हे एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाच्या असंस्कृतपणाचे लक्षण आहे. संविधानाशी फारकत घेऊन ते वागत आहेत.
इतर पक्षांतून भाजपात गेलेले ‘आम्ही आता चिंतामुक्त झालो असून, आता निवांत झोप येते’ असे सांगत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची भाजप आता राहिलेली नाही. आता संविधान पायदळी तुडवून आम्ही म्हणतो तेच खरे असे म्हणणाऱ्या लोकांची भारतीय जनता लाँड्री अस्तित्वात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.