पंढरपूर : अनेक बंद पडलेले साखर कारखाने व तोट्यात असलेले परिवहन महामंडळ फायद्यात आणलेले सहकारातील डाॅक्टर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन झाले. काल सोमवारी रात्री साडेअकरा वाजता पुण्यातील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजता पुणे येथे शासकीय नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
माजी आमदार, सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले. त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. त्यांच्या निधनाने पंढरपूर शहर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परिचारक यांनी तब्बल २५ वर्षे पंढरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. याचबरोबर दीर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात तोट्यात असलेले महामंडळ त्यांनी फायद्यात आणले. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या श्रीपुर व भीमा सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपाकडून लढवली होती.
5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवारपासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यांसारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला न्यूमोनिया यामुळे त्यांची ही लढाई कठीण होत गेली. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार सुरू होते. परंतु सोमवारीय रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
परिचारक यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तरी अशा संकटप्रसंगी त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या एका फेसबुक पोस्ट द्वारे आवाहन केले आहे.
पंढरपूर अर्बन बँक आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे त्यांनी अनेक वर्षे समर्थपणे नेतृत्व केले. आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांचे ते मार्गदर्शक होते. सुमारे 50 हून अधिक वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने त्यांनी आगळावेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळे सहकारातील ऋषितुल्य नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. राजकारणातील संत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
ते श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांच्याच सूचनेनुसार बैलपोळा सणासाठी दोनशे रुपयांचा हप्ताही जाहीर करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने व सहकारी संस्था उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्याच्या राजकारणात सहकारातील डॉक्टर अशी त्यांची ओळख होती.
* सुराज्य डिजिटल आणि दै. सुराज्य परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली *