□ राऊत यांना विकास निधीसाठी सदैव सहकार्य : फडणवीस
□ फडणवीस यांच्या हस्ते बार्शीत विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण
बार्शी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र राऊत यांचा कार्यसम्राट आमदार असा उल्लेख बार्शीत केला. आपण राजाभाऊंसारखा लोकप्रतिनिधी निवडून देता त्यामुळे तुमच्या मताचे दान सत्पात्री पडते. त्यामुळे बार्शीचे परिवर्तन झाले. बार्शीतील भगवंत स्टेडियमसाठी अनेकांना निधी दिला पण आ. राजाभाऊंसारखे काम कोणाला करता आले नाही, असा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. Appreciation from Barshit Devendra Fadnavis; MLA Rajendra Raut is the chief minister
बार्शीच्या मतदारांनी आमदार राजाभाऊ राऊत यांना मतांचे सत्पात्रीदान देत समर्थ लोकप्रतिनिधी निवडून दिला असून त्यांना तालुक्याच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी निधीबाबत कायम सहकार्य राहील, असे अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गांधी चौकात हजारो बार्शीकरांच्या उपस्थितीमध्ये दिले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार सुरेश धस, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, नगरसेवक विजय राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, ‘आमदार राऊत यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मांडल्या. त्यांना आजपर्यंत कधीही विकासनिधी कमी पडू दिला नाही. त्यांना उपसा सिंचन योजनेसाठी ७०० कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ३५० कोटी रूपये तातडीने देत आहोत. लवकरच या कामाच्या निविदा निघतील.
आमदार राऊत यांनी तालुक्यातील आठ मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मागितलेला ८० कोटी रूपयांचा निधी तात्काळ मंजूर केला. त्यांना तालुक्याच्या विकासाबाबत सतत पाठबळ देऊ. कारण बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून या शहरात परिसरातील इतर तालुक्यातील जनताही धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य व व्यापारासाठी कायम येते. बाजारपेठ व व्यापारपेठ भरभराटीला येण्यासाठी
आमदार राऊत यांनी केलेल्या प्रयत्नांना कायम साथ देऊ. शहरातील भुयारी गटार योजना चांगले काम करून अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल फडणवीस यांनी यावेळी आमदार राऊत यांच्या कार्यपध्दतीबद्दल गौरवोद्गार काढले.
शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा शासनाचा मानस आहे, असे सांगत फडणवीस यांनी सौर फिडर कार्यान्वित करणार आहोत. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय संवेदनशीलतेने घेतला आहे. आमदार राऊत यांच्या सार्वजनिक रस्त्यांबाबतच्या निधी मागणीविषयी फडणवीस यांनी माजी व विद्यमान बांधकाम मंत्री आमदार राऊत यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांचे निधीबाबत अडणार नाही, असे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी प्रास्ताविकात आमदार राऊत म्हणाले, ‘बार्शी-कुर्डुवाडी संयुक्त पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्या सारख्या फुटतात, त्यामुळे समांतर पाणी पुरवठा योजना अंमलात आणणे गरजेचे आहे. तालुका उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला गेल्यानंतर तालुक्यातील १२,५५० हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे ही योजनेची पूर्तता होणे गरजेचे आहे. यापूर्वी साठवण तलाव बंधारे यासाठी फडणवीस यांनी मोठा निधी दिला. बार्शी उस्मानाबाद रस्ता, बार्शी-सोलापूर रस्ता फडणवीस यांच्या निधी मंजुरीमुळेच झाला. आता माढा- उस्मानाबाद, बार्शी-तुळजापूरसाठी निधीची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीबरोबरच जिल्ह्याच्याही पाणी प्रश्नासाठी सहकार्य करावे, कायम शेतकरी व समाजाच्या विकासासाठीच निधीची मागणी केली असून अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कामे करू, असे वचन यावेळी आमदार राऊत यांनी दिले.
फडणवीस यांच्या हस्ते शहरातील भुयारी गटार योजना या ११२ कोटी रूपयांच्या कामाचा लोकापर्ण सोहळा तसेच १३ रस्त्यांसाठी ८९ कोटी रूपये निधीच्या विकास कामांचा तसेच १५९६ परांच्या नियोजित वसाहतीच्या ऑनलाईन शुभारंभ झाला. तसेच फडणवीस यांच्या हस्ते बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील उद्योगपती दिलीप व शितल गांधी यांच्या सोयाबिन प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ झाला. त्यांनतर फडणवीस यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल अंतर्गत ट्रॉमा युनिटला सदिच्छा भेट दिली व निधीचे अभिवचन दिले. फडणवीस यांनी शहरातील दैवत श्री भगवंत मंदिरात दर्शन घेतले.
फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्येही कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन भगवंताच्या पायावर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. ही गेल्या जन्मीची पुण्याई आहे, असा उल्लेख केला. तसेच आमदार राऊत यांनीही श्री विठ्ठल व भगवंताच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग लाभल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्य यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निता देव यांनी सूत्रसंचालन केले.