– तेव्हा गिरण्यांचा आणि आता स्मार्टसिटीचे कामकाज भोंग्यावर
– आ. प्रणिती शिंदे यांनीही केले कौतूक
सोलापूर : स्वातंत्र्य पूर्वकाळापासून सोलापूर हे गिरणगाव म्हणून जगप्रसिद्ध होते. नियमितपणे वाजणाऱ्या गिरण्यांच्या भोंग्यावर सारे शहर तेव्हा सतर्क आणि जागे व्हायचे. काळानुसार विविध कारणास्तव गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट होत गेली. गिरणगाव ते स्मार्ट सोलापूर असा आमूलाग्र बदल झाला. मात्र सूत व कापड गिरण्यांच्या त्या भोंग्याचा आवाज स्मार्ट महापालिकेने आजही जपलाय.. हे विशेष महापालिकेच्या या भोंग्याच्या आवाजाचे आ. प्रणिती शिंदे यांनीही कौतूक केले आहे. Smart Solapur Municipal Corporation preserves the sound of Girangaon Bhonga
सोलापुरातील पहिली गिरणी शेठ गोकुळदास मोरारका यांनी १८७४ मध्ये सुरू केली. तिला आजही आपण जुनी मिल म्हणून ओळखतो. त्यावेळी सोलापूर शहरात पूर्वी लक्ष्मी विष्णु, नरसिंग गिरजी, जाम श्री, सोलापूर सूत मिल, यशवंत, शारदा यासह अनेक छोट्या-मोठ्या सूत गिरण्या होत्या. सोलापूरला गिरणगाव’ अशी नवी ओळख मिळाली.
या गिरण्यांमध्ये हजारो कामगार कार्यरत होते. त्यावेळी गिरणी सुरू झाल्यावर भोंगा सुरू होत होता. सर्व पाळ्यांमध्ये चालणाऱ्या गिरणीमध्ये नियमितपणे वाजणाऱ्या भोंग्यावर सारे शहर तेव्हा सतर्क आणि जागे व्हायचे. मात्र कालांतराने मात्र आधुनिकीकरण, जागतिकीकरण आले आणि औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विविध कारणास्तव गिरण्यांनी मान टाकली. गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट झाली आणि भोंग्याचा आवाजही बंद झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, गिरणगावातील बंद कापड गिरण्यांच्या भोंग्याचा आवाज मात्र स्मार्ट सोलापूर पालिकेने जपला आहे.
पूर्वी कापड गिरण्यांच्या शिफ्ट वाईझ भोंग्याच्या आवाजावर कामगार सतर्क रहायचे आणि आता शहराचा कारभार पाहणाऱ्या स्मार्ट पालिकेचे कामकाज भोंग्यावर चालत आहे. सकाळी पावणे दहा वाजता सोलापूर पालिकेचा भोंगा वाजतो.. जेवण सुट्टीसाठी दुपारी दीड वाजता.. पुन्हा २ वाजता आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता शेवटचा भोंगा वाजतो. त्यावरच पालिका कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. गिरण्यांच्या त्या भोंग्याचा आवाज महापालिकेने आजही जपला आहे. याबाबत निवृत्त कामगारांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
□ गिरण गावची आठवण झाली : आमदार शिंदे
मध्यंतरी १९९५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे आदेश वाटप करण्यासाठी आ. प्रणिती शिंदे सायंकाळी महापालिकेत आल्या होत्या. त्यावेळी सायंकाळच्या सुमारास कार्यक्रमादरम्यान महापालिकेचा भोंगा वाजला. त्यावेळी आ. शिंदे यांनी आपले भाषण थांबवून हा कशाचा आवाज आहे, असे विचारल्यावर कामगारांनी हा भोंग्याचा आवाज आहे असे सांगितले.
त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांना गिरण्याच्या भोंग्याचा आवाज आठवला. त्यांनी जुन्या काळी गिरण्यातील भोंग्याचाही असाच आवाज होता. त्यामुळे पुन्हा एकदा गिरणगावची आठवण झाल्याचे सांगत महापालिकेचे कौतूक केले.