□ पवारांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनाही खडसावले
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जुने झाले, असे विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘जेव्हा जेव्हा राज्यपालांना भेटलो. त्या त्या वेळी आता बस्स झाले. महाराष्ट्राच्या बाहेर जावेसे वाटतेय,’ असे राज्यपाल आपल्याला म्हणायचे, असे पवार यांनी म्हटले. त्यामुळे राज्यपाल राजीनामा देणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. Governor Ajit pawar said .. Now buses are done Karnataka Chief Minister Bommai Khadsawale
विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळेस त्यांनी कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या बेताल वक्तव्याचाही समाचार घेतला. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या बाहेर जायची घाई असेल तर जरूर जावे. पण त्यांचे वरिष्ठ त्यांना संधी देत नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या महापुरूषांबाबत आक्षेपार्ह विधान करून अवमान करू नये. असे स्षष्ट करताना ‘ज्या ज्या वेळी राज्यपालांना भेटलो. त्या त्या वेळी आता बस्स झाले. महाराष्ट्राच्या बाहेर जावेसे वाटतेय.’ असे राज्यपाल म्हणायचे, असा गौप्यस्फोटच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केला.
मी राज्यपालांना विरोधी पक्षनेता म्हणून जाऊन भेटू शकतो. मी उपमुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला जायचो. मला राज्यपाल म्हणायचे, की अजितजी मुझे अभी बस.. मुझे अभी यहा नही रहना है… जाना है. मी त्यांना वरिष्ठांना हे सांगा, असे सांगितले होते. त्यांना जाण्याकरिता वरिष्ठ परवानगी देत नाहीत म्हणून ते अशी वक्तव्ये केल्यानंतर तरी वरिष्ठ इथून आपल्याला पाठवतील, तसे काही राज्यपालांच्या मनात आहे का, अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होते, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महापुरुषांबद्दल निंदनीय वक्तव्याची दखल केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून परत बोलवावे व महाराष्ट्राचा अपमान थांबवावा, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. दरम्यान, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही पवार यांनी तीव्र निषेध केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांना पदावरून हटवले जाते की त्यांना दुसऱ्या राज्यात पाठवले जाते, याकडे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यपालांना तातडीने महाराष्ट्रातून हटवावे, अशी मागणी केली जात आहे. पण राज्यपालांच्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गेले दोन दिवस जी काही वक्तव्य येत आहेत, त्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र निषेध व्यक्त करत तुम्ही महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का, त्यांना काय महाराष्ट्र असा-तसा वाटला का? असा सवाल उपस्थित केला.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा ठोकला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर ताशोरे ओढले असून महाराष्ट्राची एक इंच जागा देखील जाऊ देणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा बसवराज बोम्मई यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कोलकोट तालुक्यातील गावांबद्दल वक्तव्य केले. सातत्याने बघतोय की, काहीही कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.
हा प्रकार म्हणजे लोकांचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भाषेत बसवराज बोम्मई यांना समज दिली पाहिजे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचेच आहेत असेही अजित पवार म्हणाले. याआधीच्या काळात अशा प्रकारची वक्तव्य होत नव्हती. आता महाराष्ट्राची मुंबईचं मागायची बाकी राहिलंय का काय? असेही अजित पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्राची जनता त्यांची अशी वक्तव्य कदापी सहन करणार नाही. त्यामुळं बोम्मई यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नये, असेही अजित पवार म्हणाले.