सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा आणि सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी सोलापुरात चर्चे चा विषय ठरली आहे. एकीकडून चिमणी पाडण्यासाठी जोर लावला जात असतानाच दुसरीकडून चिमणी वाचवण्यासाठी सोमवारी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. March to save the Chimney, ‘Leadership’ change, different talk Siddheshwar Sugar Factory Dharmaraj Kadadi या मोर्चात सिध्देश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी कारखाना बंद पाहण्याचा आणि सिध्देश्वर यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करणारे आपल्याच समाजातील आपलेच नेतृत्व बदलण्याचे आवाहन केले. त्यामुळे ‘यात्रा कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला?’ याची वेगळीच चर्चा ‘तम तम मंदी मध्ये सुरू झाली.
सिध्देश्वर कारखान्यावरून निघालेला मोर्चा जेव्हा होम मैदानावर आला तेव्हा मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यावेळी मोर्चेकऱ्यांना उद्देशून बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष विद्यमान मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी थेट समाजातील नेतृत्व बदलाचेच आवाहन केले. त्यामुळे मोर्चाची चर्चा बाजूला राहिली आणि दिवसभर नेतृत्वबदलाचीच चर्चा सुरू झाली.
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना हा तर कष्टकरी शेतकरी, कामगारांची जीवनवाहिनी आहे. कारखान्याचा वाढता विस्तार काही मंडळींना बघवेनासे झाला आहे. त्यातूनच चिमणीचे कारण पुढे करून कारखाना बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे आपल्या संयमाचा बांध सुटला आहे. इर्षेतून तर काही जण व्यक्तीद्वेषातून कारखाना बंद पाण्यासाठी आग्रही आहेत. असे हीन दर्जाचे राजकारण करणाऱ्याना त्यांची जागा आता दाखवावी लागेल, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काही जुन्या घराण्यातील मंडळींनी सिध्देश्वर कारखाना व देवस्थानात आपण सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांनी कुजक्या मनस्थितीत काम केले. त्यांची ही मानसिकता संस्थेला हानिकारक ठरणारी होती, असा टोलाही काडादी यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला आहे.
कारखान्यासाठी सहकार्य करणाऱ्यांमध्ये प्रथम शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजयमामा शिंदे, बबनराव शिंदे, प्रणिती शिंदे, जयंत पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यास आताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेकांची नावे घेत आभार मानले. मात्र सोलापूरच्या दोन देशमुखांचा नामोल्लेख मात्र टाळला.
आपला माणूस म्हणून सोलापूरकरांनी तीनवेळा विधानसभेवर निवडून देऊन आमदार केले. जेव्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याची वेळ आली; तेव्हा नेतृत्वाविषयी विचारणा करण्यात आली. समाजातील चांगली व्यक्ती म्हणून व त्यांचा समाजाला काही तरी उपयोग होईल; या हेतूने मंत्रिमंडळात समावेशासाठी शिफारस केली. परंतु त्याच व्यक्तीने मंत्री झाल्यापासून त्रास देण्यास सुरुवात केली. सिध्देश्वर कारखाना कसा बंद पडेल, ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा कशी थांबेल, असा उद्योग मंत्रिपद मिळाल्यापासून केला, म्हणून आता नेतृत्व बदलाची आवश्यकता असल्याचे सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी मत मांडले.
● देवेंद्र फडणवीसांचा गैरसमज करून दिला
कारखान्याच्या चिमणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक होते. मात्र त्यांचा कोणीतरी कारखान्याबाबत गैरसमज करून दिला. त्यामुळे त्यांची भेट घेऊन गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे मत काडादी यांनी व्यक्त केले.
● चिमणीमुळे होत नाही प्रदूषण
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना चांगल्या पध्दतीने सुरू असून कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १६ कोटी युनिट विजेची निर्मिती झाली. यातील १२ कोटी युनिट विजेची विक्री झाली. त्यातून ६० कोटींचे उत्पन्न मिळाले.
या प्रकल्पाची चिमणी ही अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असून त्यामुळे कसलेही प्रदूषण होत नाही. असे असताना चिमणीचे कारण पुढे करून काही मंडळी इर्षेतून तर काही जण व्यक्तीद्वेषातून कारखाना बंद पाडण्यासाठी आग्रही आहेत, असा आरोप काडादी यांनी यावेळी केला.