मोहोळ : बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून कंपनीवर कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत चक्क तहसीलदारानाच खंडणी मागितली. यात आमदार बच्चु कडूंच्या प्रहार संघटनेतील सोलापुरातील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. Extortion demanded from Mohol Tehsildar; Taluk president of ‘Prahar’ arrested, Kulkarni filed a case against the city president
रॉयल्टी न भरता बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून चिंचोली काटी एमआयडीसी येथील बालाजी अमाईन्स कंपनीने बेकायदेशीरपणे मुरुम उचलला आहे. या कंपनीवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देत मोहोळच्या तहसीलदारांना ५० हजाराची खंडणी मागून ८ हजार रुपयांची रोख रक्कम तहसिल कार्यालयात स्वीकारली. यावेळेला प्रहार संघटनेच्या मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे यांना मोहोळ पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत मोहोळ पोलिसात संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी व वैभव जावळे यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैधपणे गौण खनिजांच्या उपशाबाबत वैभव जावळे यांनी तहसिलदार प्रशांत बेडसे यांना इशारा दिला होता. त्यावर तहसीलदारांनी आम्ही कारवाई केली आहे त्याची माहिती हवी असेल तर माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मागून घ्या असे सांगितले. त्यावर जावळे याने शहराध्यक्ष अजित कुलकर्णी याला फोन लावून तहसिलदारांना दिला. कुलकर्णी याने जावळे याच्याकडे ५० हजार रुपये देऊन टाका म्हणजे आम्ही आंदोलन करणार नाही, असे सांगीतले. तहसिलदारांनी यास नकार दिला.
त्यानंतर वेळोवेळी जावळे याने तहसिलदार यांच्या दालनात येऊन पैशाची मागणी सुरुच ठेवली होती. यानंतर शुक्रवारी (ता. 23) जावळे यांनी मोहोळचे तहसीलदार बेडसे यांना पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली. तहसीलदारांनी या त्रासाला कंटाळून मोहोळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर तहसील कार्यालयात येऊन जावळे याने ३० हजार रुपये तरी कोणाकडे द्या अशी मागणी केली. त्यावर तहसिलदार यांनी कार्यालयातील लिपिक अरगडे यांच्याकडे पैसे देतो असे सांगीतले.
अरगडे यांच्याकडे जाऊन कार्यालयातील सर्वांसमक्ष ८ हजार स्विकारताना त्याला साध्या वेशातील मोहोळ पोलीसांनी जावळे यास रंगेहाथ पकडले. तपास स.पो.नि. राजकुमार डुणगे हे करीत आहेत. शनिवारी जावळेला मोहोळ न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पंढरपुरात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
सोलापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सोलापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. युवराज कृष्णा भालेराव (वय 56) असे मयत उपनिरीक्षकाचे नाव आहे. भालेराव हे पंढरपुरातील विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मामाच्या गावी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे गेले असता तेथेच त्यांचे निधन झाले. भालेराव यांची नुकतीच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या निधनाने सोलापूर सह राज्य पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. हा प्रकार शुक्रवार (ता २३ डिसेंबर) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
पंढरपूर येथील संत निरंकाही मठ, सांगोला रोड येथे भालेराव हे राहावयास होते. मोहोळ येथे दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त मामाच्या गावी गेले होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची खबर चेतन भालेराव यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत आहेत. भालेराव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे.