सोलापूर : पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना काल शनिवारी (ता. 24) घडली. Solapur. Akkalkot escape of the accused from the police station
देवराज दिलीप पवार (वय १९, रा. वडार गल्ली) असे आरोपीचे नाव आहे. पवार याच्याविरुध्द दक्षिण पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दक्षिण ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या पथकाने आरोपीला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपबाहेर काढले.
त्यास प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी पोलीस कर्मचारी दासरे व अंगुले यांनी नेले. न्यायालयाने त्यास २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने त्यास पोलीस ठाण्यामध्ये चौकशी व जबाब घेण्यासाठी आणून बसविले. त्यावेळी तो अचानक उठल्याने पोलीस पथकाने त्याच्या हाताला पकडले. त्यावेळी पोलिसाच्या हाताला हिसका देऊन तो पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. या घटनेची तक्रार काकडे यांनी उत्तर पोलीस ठाण्यात दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कोरड्या विहिरीत पडल्याने विवाहित तरुणी जखमी
सोलापूर – शेळ्या चारत असताना तोल जाऊन कोरड्या विहिरीत पडल्याने २३ वर्षीय विवाहित गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास होटगी (ता.दक्षिण सोलापूर) येथे घडली.
पूजा माधव माने (वय २३ रा.होडगी रोड, दक्षिण सोलापूर) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला उपचारासाठी केशव माने (दीर) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुपारी एक वाजेच्या सुमारास ती शेळ्या चारत होती त्यावेळी कोरड्या विहिरीजवळ तिचा तोल गेल्याने ती विहिरीत पडून जखमी झाली. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ झोपेत ट्रक चालविणाऱ्या ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – ट्रक चालवत असताना झोप लागली आणि ट्रक समोरच्या वाहनाला धडकून गंभीर जखमी झालेल्या ड्रायव्हरचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना रविवारी मृत्यू झाला.
शिवानंद गुंडप्पा ऐवळे (वय ४० रा. आळंद जि. कलबुर्गी) असे मयताचे नाव आहे. तो १५ डिसेंबर रोजी पुणे ते सोलापूर असा ट्रान्सपोर्टचा ट्रक घेऊन प्रवास करीत होता. शेटफळ (ता. मोहोळ) नजीक त्याला झोप लागली. आणि ट्रक समोरच्या वाहनाला पाठीमागून धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .