सोलापूर : परीक्षा देऊनही चार वर्षांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, पुणे या महाविद्यालयातील एमबीएच्या 35 विद्यार्थ्यांना आता त्यांचा निकाल हाती मिळणार आहे. राज्याच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाने तसे आदेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश दिला. मात्र, त्यांची पात्रता आणि मान्यताच घेतली नव्हती. त्यामुळे 2016-17 आणि 2017-2018 या दोन वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्या तीन सेमिस्टरचा निकाल देण्यात आला. त्यानंतर अंतिम सत्राचा निकाल देण्यापूर्वी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची मान्यता आणि पात्रता अपूर्ण असल्याचे कारण देत निकाल प्रलंबित ठेवला.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित संस्थेत गोंधळ घातला. विद्यापीठातही त्यांनी धाव घेतली, मात्र तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल गुणपत्रिका दिली. परंतु, संस्थेने प्रवेश नियामक मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मान्यता मिळविली. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.