सोलापूर : घरकुलचा हप्ता मिळण्यासाठी पंचायत समितीला अहवाल पाठविण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांसह तिघांना न्यायालयाने प्रत्येकाला पाचवर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. Five years of hard labor for Mohol Solapur along with village development officer in bribery case
टाकळी सिकंदर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी, तत्कालीन सरपंच नवनाथ तुळशीराम अनुसे व तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी मोहम्मद कचरोद्दीन पठाण अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुलै 2012 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी पंचायत समिती मोहोळ या ठिकाणी अहवाल पाठवण्यासाठी आरोपींनी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधून तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने लाचेचा सापळा लावला होता. त्यावेळी तिघांना लाच स्वीकारल्यानंतर पकडण्यात आले होते. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीशक गणेश जवादवाड यांनी करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये दोषी धरून पाचवर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे ॲड. अल्पना कुलकर्णी तर आरोपींतर्फे ऍड राहुल खंडाळ, अँड निलेश जोशी, ऍड व्ही. पी. शिंदे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● कुंभारी जवळ चार चाकी वाहन कट मारल्याने दुचाकी वरील तरुण ठार; भाऊ जखमी
सोलापूर- चार चाकी वाहन पाठीमागून कट मारल्याने दुचाकी वरून घसरून तरुण ठार तर त्याचा भाऊ जखमी झाला. हा अपघात सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील कुंभारी जवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.
नागेश सुरेश श्रीमंडी (वय २४ रा.मदर इंडिया झोपडपट्टी, कुमठा नाका सोलापूर) असे मयताचे नाव आहे. तर त्याचा भाऊ सिद्धराम श्रीमंडी हा जखमी झाला आहे. ते दोघे काल मैंदर्गी येथे पाहुण्याकडे गेले होते. तेथून परत सोलापूरकडे येताना रात्री ९ च्या सुमारास कुंभारी येथील कामत हॉटेल जवळ पाठीमागून चार चाकी वाहनाने कट मारुन तसाच पूढे गेला. त्यामुळे दोघे भाऊ दुचाकीवरून कोसळून जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नागेश श्रीमंडी हा उपचारापूर्वी मयत झाला.
मयत नागेश हा अविवाहीत असून तो फायनान्स कंपनीत काम करीत होता. त्याच्या पश्चात आई वडील ३ भाऊ आणि १ बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद वळसंग पोलिसात झाली.सहाय्यक फौजदार रावडे पुढील तपास करीत आहेत.
● येणेगुर जवळ अपघात; पादचारी ठार
हैद्राबाद महामार्गावरील येणेगुर येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने मुसा इकबाल पटेल( वय५५ रा.कोळनूर पांढरी,ता. लोहारा) हा पादचारी गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाला. बुधवारी सायंकाळच्या सुमारात हा अपघात घडला. त्यांना उमरगा येथे प्राथमिक उपचार करून इकबाल (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान ते पहाटे मयत झाले, अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.