पंढरपूर : दुधामध्ये भेसळ करण्यासाठी बारामती येथून 14 कॅन मध्ये रसायन घेऊन जाणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. Milk adulteration gang busted by police at Baramati Rasayan
याप्रकरणी निलेश बाळासाहेब भोईटे (रा. टाकळी, ता. पंढरपूर), परमेश्वर सिद्धेश्वर काळे (रा. फुलचिंचोली, ता.पंढरपूर) व गणेश हनुमंत गाडेकर (रा. गणेश नर्सरी जवळ, पंढरपूर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार नवनाथ सावंत हे सोमवारी (ता. 16) मध्यरात्री एक वाजता गस्त घालत असताना वाखरी – गुरसाळे बाह्यवळण येथील उड्डाणपूल नजीक दोन संशयित वाहने जाताना आढळून आली. सावंत यांनी तपासणी केली असता यापैकी एका टाटा टेम्पोमध्ये 19 रिकामे कॅन होते तर दुसऱ्या टेम्पोमध्ये 14 कॅन मध्ये पांढऱ्या रंगाचे रसायन आढळून आले.
याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर 14 कॅनमधील रसायन हे दुधात मिसळण्यासाठी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सुमित मेहता याच्याकडून आणले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सदर रसायनाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पैशाच्या व्यवहारावरून चाकूने भोसकले
पंढरपूर – जुन्या पैशाच्या व्यवहारातून तरुणास लाथाबुक्याने मारहाण करून पोटात चाकू खूपसल्याची धक्कादायक घटना संक्रांतिदिवशी घडली.
याप्रकरणी बबलू प्रक्षाळे, सोमनाथ खंकाळ, विक्रांत माने व दोन अनोळखी अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उमेश सुखदेव खाडे रा.आढीव यांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी की उमेश खाडे याचा बबलू प्रक्षाळे बरोबर आर्थिक व्यवहार होता. तो त्यांनी काही दिवसापूर्वीच पूर्ण देखील केला होता. मात्र यानंतर देखील बबलू वारंवार त्याच्याकडे पैशाची मागणी करीत होता. यावरूनच रविवार 15 रोजी बबलू याने उमेश यास भटुंबरे नजीक बोलवून घेतले. उमेश व त्याचा मित्र सोमनाथ सलगर हे दुचाकीवरून जात असताना विक्रांत माने याने त्यांची दुचाकी अडवली तर सोमनाथ खंकाळ याने त्याच्या छातीत दगड घातला. यावेळी उपस्थित असलेल्या दोघांनी लाथा बुक्क्याने मारहाण केली तर बबलू याने हातातील चाकू उमेशाच्या पोटात खूपसला तसेच तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बबलू प्रक्षाळे, सोमनाथ खंकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात करत आहेत.
वाळूच्या पैशावरून वाद झाल्याच्या बातम्या प्रसारित झाले आहेत मात्र या एफ आय आर मध्ये वाळूच्या पैशाचा कुठेही उल्लेख फिर्यादीने केला नाही. वाळूच्या पैशातून हवा झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.