सोलापूर : शेतकर्यांना रात्री-अपरात्री शेताला पाणी द्यायला लागते. हे काम शेतकर्यांना दिवसाही करता यावे यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप’ योजना शासनाने आणली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 600 शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून आणखीन शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची पडळकर यांनी माहिती दिली. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट वाढावे, त्यांचा कृषीपंपाच्या खर्चात बचत व्हावी, रात्री-अपरात्री शेतावर जावे लागू नये, दिवसा वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप’ योजनेंतर्गत सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यात 7 हजार 376 शेतकर्यांनी अर्ज केले होते. 2 हजार 204 शेतकर्यांना मंजुरी देऊन त्यांना वीज वितरण कंपनीकडून कोटेशन देण्यात आले आहेत. या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या 8 जागांमध्ये व शासकीय दोन जागांवर एकूण 2 हजार 580 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातील महावितरण कंपनीच्या उपलब्ध जागेतील 3.01 मेगावॅट क्षमतेचे चार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित प्रकल्पांचे कामही सुरू आहे. शासकीय दोन जागांवरील 20 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कामही सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
* जिल्ह्यात 10 लाखांहूनही अधिक वीज ग्राहक
जिल्ह्यात एकूण 10 लाख 41 हजार 19 वीज ग्राहक असून यामध्ये 5 लाख 98 हजार 121 घरगुती, 3 लाख 56 हजार 393 कृषीपंप, 65 हजार 387 वाणिज्यिक, 11 हजार 554 औद्योगिक, 9564 इतर असे ग्राहक आहेत. सन 2019-20 याकालावधीत जिल्ह्यात 37 हजार 746 ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून यामध्ये सर्वात जास्त 27 हजार 293 घरगुती, 5656 कृषीपंप, 3277 वाणिज्यिक, 612 औद्योगिक आणि 908 इतर अशा वीज जोडण्या आहेत. जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी 184.92 कोटी रूपयांची उच्चदाब वितरण प्रणाली मंजूर आहे. या आराखड्यात 5413 वितरण रोहित्रे, 1350.74 कि.मी. उच्चदाब वाहिनी आणि 5168 वीज जोडणींची कामे पूर्ण झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.