● आरोपी पक्षाचे म्हणणे, फिर्यादीच्या बँकखात्याची सुद्धा चौकशी
सोलापूर : सीसीएच अँपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनंत येरंकल्लू व जयंत येरंकल्लू यांच्या पोलीस कोठडीत 19 जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात अनेटा व सीसीएच अॅपचा मालक या दोघा आरोपींची नावे वाढविण्यात आली आहेत. Increase in custody of accused in CCH app case, name of accused increased
12 ऑक्टोबर रोजी अनंत येरंकल्लू, जयंत येरंकल्लू, स्मिता येरेकल्लू यांच्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस तिन्ही आरोपींच्या शोधात होते. दरम्यान, यातील अनंत व जयंत येरंकल्लू यांना शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिन्यांनी गेल्या मंगळवारी अटक केली. त्यांना 17 जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.
न्यायालयात युक्तिवादादरम्यान पोलिसांनी गुन्ह्याचा आवाका मोठा आहे, आर्थिक गुन्हा आहे, आरोपींनी हे अँप कसे चालवत होते, याची माहिती आरोपींकडून मिळाली आहे, सोबतच आरोपींकडून पैसे मोजण्याचे मशीन जप्त केले आहे व घोट्याळ्यामधून मिळवलेल्या पैश्यामधून आरोपींनी स्थावर मालमत्ता घेतली आहे का याची सुद्धा चौकशी करावयाची आहे, त्यामुळे आरोपींना पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सदरचा गुन्हा हा पूर्णतः तांत्रिक आहे, शिवाय पोलिसांनी कुठलेही नवीन मुद्दे मांडलेले नाहीत, आरोपींनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जासोबत कोर्टात माहिती व कागदपत्रे दाखल केली होती, तीच माहिती आज पोलीस कोर्टापुढे दाखवत आहेत, त्या व्यतिरिक्त नवीन कुठलीही माहिती पोलिसांकडून उलगडत असल्याचे दिसून येत नाही. शिवाय फिर्यादींनी एकही पैसा आरोपींच्या खात्यात जमा केला नाही. त्यामुळे 76 लाख रुपये एवढी रक्कम आरोपींकडून वसुली करणे योग्य नाही आणि तशी कायदेशीर जबाबदारी आरोपींची येत नाही. शिवाय आरोपी हे व्यवसायिक असल्याने पैसे मोजण्याचे मशीन बाळगणे ही मोठी गोष्ट नाही. उलट फिर्यादीच्या बँकखात्याची सुद्धा चौकशी करावी.
आरोपींच्या खात्यामध्ये यातील कुठल्याही तक्रारदारांनी पैसे गुंतवले नाहीत. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी आरोपीस दोन दिवसांची 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. यात सरकारतर्फे अॅड. दत्तूसिंग पवार व आरोपीतर्फे अॅड. मंजुनाथ कक्कलमेली यांनी काम पाहिले.