पंढरपूर / सूरज सरवदे : मंगळवेढा येथे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने परिचारक – भालके समविचारी आघाडी निर्माण झाली आहे. आमदार समाधान आवताडे यांना बाजूला ठेवण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका मंगळवेढ्यात समविचारी आघाडी एकत्रित लढविण्याचा मानस आहे. Activists Unsettled by Caretaker-Bhalke Like-minded Alliance; Pandharpur politics in search of reachable leadership मात्र परिचारक – भालके यांच्या समविचारी आघाडीला पंढरपुरातून विरोध होतोय. कार्यकर्ते सक्षम नेतृत्व शोधण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
ज्यांच्या सोबत गेल्या पंधरा वर्षापासून आपण राजकीय संघर्ष करत आलो आहोत, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून भगीरथ भालके यांनी बसू नये अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी परिचारक – भालके यांची युती अमान्य केली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
अडीच वर्षे सोडली तर गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर प्रशांत परिचारक यांचे एक हाती वर्चस्व आहे. अनेक वर्षे नगरपालिकेत परिचारक यांना विरोध करून कार्यकर्त्यांनी वाईटपणा घेतला आहे. त्यामुळे परिचारक यांच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मंगळवेढा येथील समविचारी आघाडी मान्य होताना दिसत नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंढरपूर नगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी परिचारकांना विरोध करावा लागेल आणि तो करत असताना मंगळवेढा येथे युती असेल तर पंढरपूरमध्ये परिचारक यांच्यावर टीका करताना अडचणी निर्माण होतील, या भावनेने पंढरपुरातील आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे अस्वस्थ झाले आहेत. कोणाला विरोध करायचा हेच कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. आपण स्वतःहून आपल्या पायावर दगड मारून घेत आहोत अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
मंगळवेढा येथे आमदार अवताडे यांना सत्तेतून दूर खेचण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मंगळवेढामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार समविचारी आघाडीची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पंढरपुरात या उलट चित्र पाहायला मिळत आहे. पंढरपुरातील कार्यकर्ते हे भालके यांच्यापासून दूर जाताना दिसत आहेत.
भगीरथ भालके यांचा आजी – माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांशी पहिल्यासारखा संवाद राहिला नाही, संपर्क राहिला नाही, असे कार्यकर्ते सांगतात. परिचारक यांच्या विरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ, पाठिंबा आवश्यक आहे. तो मिळताना दिसत नाही. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते नव्या नेतृत्वाच्या शोधामध्ये आहेत. कार्यकर्ते आता रिचेबल नेतृत्वाच्या शोधात आहेत. आपल्या पाठीशी असणारा नेता, आपल्याला पाठबळ देणारा नेतृत्व त्यांना मिळाल्यानंतर पंढरपूरच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.
येणाऱ्या काळामध्ये आमदार समाधान आवताडे आणि अभिजीत पाटील गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. कणखर नेतृत्व अभावी अनेकांना गट बदलावे लागत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पंढरपुरात समाधान अवताडे आणि अभिजीत पाटील यांच्या गटाला फायदा होणार आहे.