मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे याची परिणती होणार नाही, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल मुंबई पोलिसांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल” असा विश्वास शरद पवार यांनी ट्विटरवरुन व्यक्त केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध
“मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.” अशी आशाही पवारांनी व्यक्त केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आजच (20 ऑगस्ट) सात वर्ष पूर्ण झाली. या हत्येचा तपास सीबीआयकडे असूनही तो पूर्ण झालेला नाही, याची खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. मारेकरी पकडूनदेखील या खुनाचे सूत्रधार सापडले नसल्याने अजूनही वेदना कायम असल्याचे ते म्हणाले.