नवी दिल्ली : सलग चौथ्या वर्षी इंदौर शहराने स्वच्छ भारत सर्वेक्षणात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. देशातल्या सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
28 दिवसांच्या कालावधीमध्ये देशातल्या 4242 शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ करण्यात आलं होतं. या देशव्यापी पाहणीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ महोत्सवात याविषयीची घोषणा केली.
10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सलग चौथ्या वर्षी इंदौरने पहिला क्रमांक पटाकवला आहे. सुरत दुसऱ्या आणि नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत नाशिक शहर 11व्या, ठाणे 14 व्या, पुणे 15 व्या तर नागपूर 18 व्या क्रमांकावर आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या देशातल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या कराडची सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. याच गटामध्ये सासवड शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि लोणावळा शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.